मुंबई : घसघशीत परतव्याचे आमिष दाखवून लोकांकडून बेकायदेशीरपणे भरमसाट पैसा गोळा करून रात्रीतून गाशा गुंडाळणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तत्क्षणीच लगाम कसण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले.जनतेचा कष्टाचा पैसा हडप करून रात्रीतून गाशा गुंडाळण्यापूर्वीच अशा संस्था, कंपन्यांचा बंदोबस्त करायला हवा. या गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासंबंधीची आव्हाने अधोरेखित करताना रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, काही कंपन्या कोणत्याही नियामक संस्थेच्या अधीन येत नाहीत. एकतर या कंपन्या फार छोट्या असतात किंवा दूरवरून चालविल्या जातात; त्यामुळे या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करणे कठीण जाते. अशा कंपन्यांना वेळीच लगाम घालण्यासाठी वित्तीय नियामक संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांदरम्यान समन्वय असणे जरुरी आहे.ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे, यासारख्या कायद्यात योग्य ते बदल करण्यात आल्याने तसेच राज्यपातळीवरील समन्वय समित्यांमुळे बेकायदेशीर मार्गाने ठेवी गोळा करणाऱ्या गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्यास मोठी मदत मिळाली आहे, असे ते म्हणाले.अशा प्रकारे जनतेकडून गोळा करण्यात आलेला पैसा हडप करणे किंवा त्याचा दुरुपयोग करण्याआधीच हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला आहे. विशेष म्हणजे लोकांनी अशा कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडूच नये, असे आवाहनही राजन यांनी केले. कायद्यातील बदलामुळे मिळालेल्या अधिकारातहत सेबीने २०१२पासून अशा घटनांविरुद्ध ३२५ आदेश जारी केले आहेत.भारतीय रिझर्व्ह बँक कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा लोकांना पैशाचा वायदा करणारे ई-मेल पाठवीत नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. अशा प्रकारे घसघशीत परतावा देण्याचे किंवा दामदुपटीने पैसा देण्याची हमी वा आमिष दाखवीत असतील, तर अशा व्यक्तीला लोकांनी तत्क्षणीच प्रश्न विचारून भंडावून सोडले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. बेकायदेशीर मार्गाने ठेवी गोळा केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्यासंबंधीच्या ‘सचेत डॉट ओआरजी डॉट इन’ ही वेबसाईट सुरू करताना ते बोलत होते. या वेबसाईटतहत ठेवी गोळा करणारी कंपनी वा संस्था कोणत्या नियामक संस्थेंतर्गत नोंदणीकृत आहे किंवा त्या कंपनीला ठेवी गोळा करण्याची परवानगी आहे की नाही, याची माहिती उपलब्ध असेल. तसेच लोकांच्या तक्रारींचेही निराकरण केले जाणार आहे.जनजागरण अभियान राबवूनही वित्तीयदृष्ट्या साक्षर असलेले तसेच अडाणी असलेले लोकही अशा भूलथापांना बळी पडतात, असे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>बोगस संस्थांना रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे पोर्टलबेकायदेशीररीत्या पैसा गोळा करणाऱ्या बोगस संस्थांवर लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक वेबसाईट तयार केली आहे. कोणत्या संस्थांना निधी संकलनाची रीतसर परवानगी आहे, याची माहिती या वेबसाईटवर नागरिकांना मिळेल. सचेत डॉट आरबीआय डॉट ओआरजी डॉट इन (२ंूँी३.१ु्र.ङ्म१ॅ.्रल्ल), असा या वेबसाईटचा पत्ता आहे. धनसंग्रहाची रीतसर परवानगी असलेल्या संस्थांची इत्थंभूत माहिती या वेबसाईटवर असेल. तसेच एखाद्या संस्थेविरुद्ध तक्रार करण्याची आणि तक्रारीचा पाठपुरावा करण्याची सोय वेबसाईटवर आहे. एखाद्या विशिष्ट संस्थेला एखाद्या नियामकाकडे नोंदणी मिळाली याचीही माहिती तेथे मिळेल.
पैसा गोळा करून गाशा गुंडाळणाऱ्यांवर लगाम जरुरी
By admin | Published: August 06, 2016 4:10 AM