- चंद्रकांत दडस(उपसंपादक)
लोकसभेच्या निकालात भाजपला स्वबळावर २७२ हा बहुमताचा आकडा न मिळाल्याने ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. भाजपला बहुमत न मिळाल्याने आता मित्रपक्षांचे सरकार येईल. या सरकारमध्ये छोट्या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अस्थिरता अधिक राहण्याची शक्यता आहे तर अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे हे जाणून घेऊ... सत्ता कोणाचीही आली तरी बाजाराची चाल थांबत नाही. त्यामुळे आपण अशावेळी उत्तम कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी आणि तीही दीर्घकाळासाठी करावी. एका दिवसामध्ये झालेली घसरण काही दिवसांमध्ये भरून येते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा परतावा उत्तम मिळतो.
तुमची आर्थिक योजना विसरू नका- शेअर बाजारात ज्याच्याकडे संयम आहे तो नेहमीच जिंकतो. त्यामुळे शेअर बाजारात पडझड होत असताना तात्काळ पैसे काढण्याचा प्रयत्न करू नका. याउलट बाजार खाली जात असताना काही चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याची तुमच्यासमोर मोठी संधी असते. आपल्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक वाढवा.
असे करा नियोजनजर तुम्ही पाच वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करत असाल तर शेअर बाजारामध्ये अधिक गुंतवणूक करा. जर कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर मात्र यात तुम्हाला नुकसान होऊ शकते. तुमची आर्थिक शिस्त, अधिक बचत करण्याकडे कल, दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे नियोजन यामुळेच तुमचे आर्थिक भविष्य ठरते. त्यावर निवडणूक निकालाचा काहीही परिणाम होणार नाही हे लक्षात ठेवा.
येेथेही गुंतवणूक करून ठेवाशेअर बाजाराप्रमाणेच काही गुंतवणूक ही पोस्ट ऑफिस, गोल्ड बॉण्ड, बँकेमध्ये एफडी तसेच विविध निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांमध्ये करावी. यामध्येही कमाल ८.५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.