Join us

पै पैसा: योग्य आर्थिक सल्लागार कसा निवडाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:19 IST

Money: कुणी सल्ला देतं की तुमच्या मुलाला आयबी बोर्डात शिकवण्यासाठी एवढे पैसे गुंतवले तर असं होईल, मुलीला इंग्लंडला शिकयाला पाठवायचं असेल तर इतके पैसे असे गुंतवा... बड्या बड्या बाता आणि शब्दांचा मोह पडतो.

योग्य आर्थिक सल्लागार कसा निवडायचा, हा एक बऱ्यापैकी कॉमन प्रश्न असतो. मुळात महिन्याला जेमतेम चार हजार रुपयांची तुम्ही एसआयपी करणार असाल, तर त्यासाठी कशाला हवा आ‌र्थिक सल्लागार असाही एक प्रश्न असतो. तर त्याउलट काहीजणांना ‘आयएफए’- (इंडिपेंडण्ट फिनान्शियल ॲडव्हायजर) या संकल्पनेचाही मोह असतो. त्यांना कुणी सल्ला देतं की तुमच्या मुलाला आयबी बोर्डात शिकवण्यासाठी एवढे पैसे गुंतवले तर असं होईल, मुलीला इंग्लंडला शिकयाला पाठवायचं असेल तर इतके पैसे असे गुंतवा... बड्या बड्या बाता आणि शब्दांचा मोह पडतो. मात्र तसं करण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी केल्या तर उत्तम आर्थिक सल्लागार नक्की सापडेल.

तर त्यासाठी एक म्हणजे तो तुमची भाषा बोलणारा हवा, तुमच्या आसपास राहणारा हवा, तुम्ही वापरता तशी गाडी त्याकडे हवी म्हणजे त्याला तुमची आर्थिक स्वप्न, महत्त्वाकांक्षा समजल्या पाहिजेत. आर्थिक सल्लागार तुमच्या गुंतवणुकीला दिशा देत शिस्त लावू शकतो. मालमत्तेची वर्गवारी, धोका, इन्शुरन्स, इस्टेट नियोजन, निवृत्ती नियोजन, हे सारं तो अधिक चांगलं समजावतो, तुमचं उत्पन्न आणि परतावे यात मूल्यवर्धन करू शकतो.अर्थात असा सल्लागार सापडणं सोपं नाही. पण सापडला तर त्याला हे प्रश्न नक्की विचारा.

१) तुम्ही १९९९ ते २००२ या काळात स्वत:चे पैसे कुठं गुंतवले, नफा-तोटा काय झाला? २) तुम्ही स्वत: पर्सनली कुठं पैसे गुंतवता? ३) तुम्ही स्वत: एसआयपी करता आहात का? ४) धोक्यांचा काय विचार करता? त्याची तुमची पद्धत सांगाल का? ५) तुमचा पोर्टफोलिओ उत्तम चालला तर त्यात नशिबाचा भाग किती आणि तुमच्या स्किलचा भाग किती असं तुम्हाला वाटतं? ६) गेल्या काही काळात तुमची आर्थिक प्रगती किती झाली, अजून ती किती व्हावी असं तुम्हाला वाटतं? ७) किती क्लायंट तुम्हाला सोडून गेले आणि का? 

महत्त्वाचे: सगळेच प्रश्न विचारता येणार नाहीत, पहिल्या भेटीत तर नाहीच. पण मग काय उत्तरं मिळाली तर माणूस योग्य समजायचा? तो कबूल करेल की माझ्या काही चुका झाल्या, व्यक्तिगत आयुष्यात मी पण पैसे गमावले आहेत, काही क्लायंटशी पटलं नाही, काहीजण सोडून गेले.. असा उमदा संवाद ज्याच्याशी होऊ शकेल, तो तुम्हाला सल्लाही उत्तम देऊ शकेल.

टॅग्स :पैसा