२०२२ या वर्षांत लोकांनी आर्थिक नियोजनाबाबत काय काय संकल्प केले आहेत, याच्या एका पाहणीचे हे निष्कर्ष पाहा : या वर्षी कर्जमुक्त व्हायचं, संकटकाळासाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवायची, खर्चाचं बजेट आखायचं, निवृत्तीनंतरचं नियोजन करायचं, यंदा गुंतवणूक वाढवायची, जास्त पगार देणारी नवी नोकरी / काम शोधायचं, स्वत:चं घर घ्यायचं... इत्यादी...
संकल्प उत्तम, वास्तवदर्शी असतात, पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी आपण कच खातो. का होतं असं? तसं होऊ द्यायचं नसेल, तर काय करावं लागेल?
१. आर्थिक नियोजनासाठी प्रेरणादायक ठरणारी एखादी गोष्ट आधी निश्चित करा. तुम्ही आर्थिक नियोजन का करता आहात, यापेक्षा कसं करणार आहात, यावर सुरुवातीला जास्त भर द्या.
२. आपल्याला जमेल अशा छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. उदाहारणार्थ, तुमच्या निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी तुम्हालाही ‘किरकोळ’ वाटेल, अशी बचत करायला सुरुवात करा. एकदा ‘सवय’ लागली, की ही गोष्ट नंतर आपोआप जमेल.
३. सगळ्याच गोष्टी काही एका झटक्यात जमतील असं नाही; पण सुरुवातीला दोन महिने आपल्या खर्चाचा तर ट्रॅक ठेवा, आपला पैसा कुठे जातो, कसा जातो, हे कळेल.
४. जे काही ठरवाल, ते लिहून ठेवा आणि त्याच्याकडे ‘लक्ष’ ठेवा.
५. निवृत्तीसाठी नियोजन करीत असाल, तर आधी स्वत:साठी आवश्यक तेवढा पैसा बाजूला काढा, त्याचं नियोजन करा.
६. पूर्वी भूतकाळातही कदाचित असे संकल्प तुम्ही केले असतील, ते हवेत विरून गेले असतील; पण भविष्यातही तसंच होईल, असं म्हणून पाय मागे घेऊ नका. कचरू नका. तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करा.
७. एकदम वर्षभराची कमिटमेंट करण्याची तरी काय गरज आहे? तीन महिन्यांसाठी, महिन्याभरासाठी का असेना, काहीतरी ठरवा आणि तेवढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
८. आणि सगळ्यांत महत्त्वाचं : आयुष्य किती क्षणभंगुर आहे हा धडा कोविडने आपल्याला शिकवला आहे; त्यामुळे पुरेशी मजा(सुद्धा) करा! आज पिझ्झा खाल्लाच पाहिजे का? - या प्रश्नाचं उत्तर दरवेळी ‘नाही, नको’ असं देण्याचीही गरज नाही !