Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती

‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती

मनी लाँड्रिंग प्रकरण; ईडीकडून बंगल्यातील कागदपत्रे हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:09 AM2021-07-17T06:09:57+5:302021-07-17T06:11:03+5:30

मनी लाँड्रिंग प्रकरण; ईडीकडून बंगल्यातील कागदपत्रे हस्तगत

Money laundering case ED searches premises linked to Videocon group | ‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती

‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती

Highlightsमनी लाँड्रिंग प्रकरण; ईडीकडून बंगल्यातील कागदपत्रे हस्तगत

सक्तवसूली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) औरंगाबादेतील ‘व्हिडिओकॉन’चे संचालक प्रदीप धूत व राजकुमार धूत यांच्या मालमत्तांवर शुक्रवारी धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. आयसीआयसीआय बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

आयसीआयसीआय बँकेने व्हिंडिओकॉन समूहाला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) या दोन केंद्रीय संस्था करीत आहेत. या प्रकरणात बँकेच्या माजी कार्यकारी संचालक तथा सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणिउद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत.

गुरूवारी मध्यरात्री ईडीचे पथक शहरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी सर्व मालमत्तांबाबत माहिती संकलनाची कार्यवाही सुरू केली. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. शहरातील होम अप्लायसेन्सच्या शोरूम्समधील व्यवहारांची पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेस्टेशेन रोडवरील धूत यांचा बंगला दुपारी २ वाजेनंतर ईडीच्या पथकाने ताब्यात घेतला. या पथकामध्ये चार अधिकाऱ्यांसह केंद्रीय पोलीस दलांचे कर्मचारी होते. बंगल्यातील पहि-ल्या शिफ्टमधील कर्मचारी निघून गेल्यानंतर दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षा केबिनजवळच थांबविण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याच्या आत गेल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत झडती घेतली. ७ वाजेच्या सुमारास दोन अधिकारी कारमधून रेल्वेस्टेशनच्या दिशेने गेले. इतर दोन अधिकारी बंगल्यात होते. दरम्यान वेदांतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंगल्यासमोर येऊन पाहणी करून निघून गेले.
४६ हजार कोटींच्या कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या व्हिडिओकॉन उद्योगाची मागील काही महिन्यांत २९०० कोटी रुपयांत सेटलमेंट होऊन कंपनीचे दुसऱ्या ग्रुपकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. ९४ टक्क्यांच्या आसपास बँकांचे नुकसान या व्यवहारात झाले आहे.

आयसीआयसीआय बँकेचे नेमके प्रकरण काय
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन संबंधी दिलेल्या कर्ज घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, कंपनीचे वेणुगोपाल धूत यांचे आरोपपत्रात नाव आहे. दीपक कोचर हे व्हिडिओकॉनची उपकंपनी असलेल्या न्यू पॉवर या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. चंदा कोचर यांनी या कंपनीला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, पुढे ते कर्ज बुडीत खात्यात गेले. याप्रकरणी ईडीने २०१८ पर्यंत चौकशी केली होती. यानंतर ईडीने धूत व कोचर दाम्पत्याविरोधात पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईनंतर व्हिडिओकॉनच्या मालमत्तांवर सीबीआयने देखील गुन्हा दाखल करत छापे मारले होते.

बंगल्यावर काही अधिकारी आले होते
ईडीच्या छाप्याप्रकरणी उद्योगपती प्रदीप धूत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी सध्या तीर्थयात्रेनिमित्त ऋषिकेश येथे आहे. आमच्या घरावर कुठलाही छापा पडलेला नाही. काही अधिकारी सकाळी ९ वाजता बंगल्यावर आले होते. कर्मचाऱ्यांना भेटून गेले. एवढीच माहिती माझ्याकडे आहे. मुंबईत गोवंडी आणि मलबार हिल भागात आयसीआयसीआय बँक कर्जप्रकरणी ईडीने काही कागदपत्रे आणि दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. मात्र, याबाबत ईडीकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

Web Title: Money laundering case ED searches premises linked to Videocon group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.