Money Management Tips: तुमच्यापैकी अनेकजण असेल आहेत, जे भरपूर पैसे कमावतात, पण खर्चही लवकर होतात. यामुळे त्यांचे संपूर्ण महिन्याचे बजेटही कोलमडते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्यांना पैशाचे योग्य व्यवस्थापन करता येत नाही. कुठे अन् किती पैसे खर्च करावे आणि किती बचत करावी, याची योग्य जुळवाजुळव केल्यावर तुम्हाला कधीच पैशांची गरज भासणार नाही. तसेच, भविष्यासाठी चांगली रक्कमही वाचवता येईल. पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक सूत्र जाणून घेणे गरजेचे आहे.
50-30-20 सूत्र
तुम्ही 50-30-20 नियम ऐकला आहे का? हा नियम पैशाच्या बाबतीत खूप फायद्याचा ठरतो. कमाई-खर्च-बचत, असा या सूत्राचा अर्थ आहे. तुम्ही जेवढे पैसे कमावता, त्यातील जवळपास 50 टक्के रक्कम कुटुंबाच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी खर्च होतात हा खर्च तुम्ही टाळू शकत नाही, परंतु उर्वरित 50 टक्के रकमेचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल.
यातील 30% रक्कमेने छंद पूर्ण करू शकता, जसे की कुटुंबासह चित्रपट पाहणे, प्रवास करणे, खरेदी करणे किंवा कोणतेही काम जे फार महत्वाचे नाही. आता 20% शिल्लक तुमच्याकडे आहे, ते कोणत्याही किंमतीत कुठेतरी गुंतवावे लागतील. ही सवय तुम्हाला कायम ठेवावी लागेल. हे सूत्र तुम्ही अवलंबले, तर तुमची चांगली बचत होऊ शकते.
उदाहरणासह समजून घ्या
समजा तुम्ही दरमहा 80000 रुपये कमावता. आता तुमचा पगार 50-30-20 च्या नियमानुसार विभागून घ्या. 80 हजारांपैकी 50 टक्के रक्कम 40 हजार, घराच्या आवश्यक खर्चासाठी वापरा. 30 टक्के म्हणजे 24 हजार, ज्यातून तुम्ही तुमचे छंद पूर्ण करा आणि 20 टक्के म्हणजे 16 हजार, वाचवा. अशा प्रकारे जर तुम्ही दरमहा 16 हजार रुपये वाचवू शकत असाल, तर तुम्ही एका वर्षात 192,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
या ठिकाणी तुमची बचत गुंतवा
पैसे गुंतवण्याची सवय लावा. यासाठी तुम्ही आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या, पॉलिसी काढा आणि दर महिन्याला गुंतवणूक करा. यामुळे बचत करणे तुमची सवय होईल आणि तुमची चांगली बचत देखील होईल. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विमा, अपघाती विमा काढून घ्या. चांगली पेन्शन योजना नक्की घ्या, कारण प्रत्येकाला वृद्धापकाळाला सामोरे जावे लागते. त्यावेळी तुमचा पैसा ही तुमची सर्वात मोठी ताकद बनेल.