जेव्हा आपल्याला वाटते की आता निवृत्ती घ्यावी त्याचवेळी मनात पहिला प्रश्न येतो की, किती रक्कम शिल्लक असायला हवी? मुळात ते तुमचे सध्याचे उत्पन्न, तुमची जीवनशैली कशी आहे यावर अवलंबून असते. निवृत्तीनंतर आरामदायी जीवनासाठी पैशांचे नियोजन कसे करावे हे येथे जाणून घेऊ...
निवृत्तीनंतर अनेकदा असे घडते की आपण संपूर्ण रक्कम नातवांच्या शिक्षणावर किंवा इतर गोष्टींवर खर्च करून बसतो. त्यामुळे त्यानंतर आपल्याला इतर गरजांसाठी कोणावर तरी अवलंबून राहावे लागते किंवा पुन्हा नोकरीवर जावे लागते. हे टाळण्यासाठी आपण आपली मिळकत नेमकी कोणत्या कारणासाठी वापरत आहोत हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न सुरू राहिले पाहिजे यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर ठरते.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्यासाठी...
नियमित उत्पन्न नसल्यास व्यक्तीला इतरांवर अवलंबून राहावे लागते किंवा मूलभूत गरजांशी तडजोड करावी लागते. त्यामुळे उत्पन्नाचा नियमित स्रोत तयार करावा. त्यामुळे आर्थिक स्वतंत्रता आणि स्वत:च्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते.
विमा काढा अन् निर्धास्त राहा
वाढत्या वयाबरोबर आरोग्याशी संबंधित समस्या वाढत जातात. त्याचा पहिला उपाय म्हणजे आरोग्य विमा काढून घ्या; परंतु बहुतेक लोक ते निवडत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना कोणतेही विमा संरक्षण नसते. यामुळे आजारपणात लाखो रुपये खर्च होतात.
पेन्शन योजनेचा फायदा
कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखीम स्वीकारण्याची क्षमता किती आहे याचा प्रथम विचार करा. सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवनासाठी नियोजन करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे, म्हणून वेगवेगळ्या आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कंपन्यांनी ऑफर केलेल्या पेन्शन योजनांमध्ये परताव्याची हमी असते, त्यामुळे ती तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा भाग बनवा.
येथे करा गुंतवणूक
रिटायरमेंटसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत जसे की, डायरेक्ट इक्विटी, म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांनी ऑफर केलेल्या पेन्शन योजना. थेट इक्विटी आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीत जास्त परतावा देण्याची क्षमता असली तरी त्यांच्याशी संबंधित जोखीमही अधिक असते. लाइफ इन्शुरन्स कंपन्यांनी ऑफर केलेल्या पेन्शन योजना कमी पण जोखीममुक्त परतावा देतात. त्यामुळे गुंतवणूक करताना सर्व बाबींचा विचार करावा.