Join us

मनी पेज- निर्यात सुलभता

By admin | Published: February 03, 2016 12:28 AM

निर्यात वाढविण्यासाठी आणखी उपाय योजणार

निर्यात वाढविण्यासाठी आणखी उपाय योजणार
नवी दिल्ली : निर्यात वाढीसाठी आपण पर्यावरण, वस्त्र आणि वित्त विभाग यांच्यासह विविध खात्यांशी समन्वयाने काम करू आणि निर्यातविषयक व्यावसायिक सुलभता वाढविण्यासाठी नवीन उपाय योजू व नियमांत सवलती देऊ, असे वाणिज्य मंत्रालयातर्फे मंगळवारी सांगण्यात आले.
आयात-निर्यातविषयक १२ संस्थांनी मंगळवारी वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. त्यात त्यांनी हे आश्वासन दिले. भारत आणि आशियाई देशात मुक्त व्यापाराचे करार झाले आहेत. या कराराचे निर्यातीवर होणार्‍या परिणामासह अनेक मुद्दे निर्यातदारांनी यावेळी उपस्थित केले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, वाणिज्य मंत्रालय निर्यातवाढीसाठी काही बाबी आणखी सुलभ करण्यासाठी पर्यावरण, कपडा, सीमा शुल्क व वित्त विभागासह उपाय योजले जातील. त्यामुळे निर्यातदारांच्या दृष्टीने व्यवसाय आणखी सुलभ होईल. या बैठकीत निर्यातदारांनी चलनाच्या दरातील चढ-उतार, विशेष आर्थिक क्षेत्र, सीमा शुल्क अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेतील समस्या, सेवा कराशी संबंधित मुद्दे उपस्थित केले.
ही बैठक दोन तास चालली. मंत्रिमहोदय म्हणाल्या की, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपयोगी मुद्दे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. ते आगामी अर्थसंकल्पात सामील केले जाऊ शकतात. डिसेंबर १४ पासून निर्यात घटत असून, तेव्हापासून निर्यात वृद्धीसाठी सरकार निर्यातदारांशी सतत चर्चा करीत आहे.