नवी दिल्ली - देशात ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्यापासून अनेक जणांनी सोबत कॅश बाळगणे बंद केले आहे. कोणत्याही ठिकाणी कितीही रकमेचे पेमेंट अगदी सहजपणे करण्याची सोय यात मिळते. यूपीआय व्यवहारांची संख्या ऑगस्टमध्ये १० अब्जांवर पोहोचली. देशात ३५ कोटी लोक यूपीआयचा वापर करतात. परंतु खात्यावर बॅलेन्स शून्य असल्यास खरेदी करताना अडचण होऊ शकते. हे लक्षात घेऊन यूपीआयने ग्राहकांच्या हितासाठी क्रेडिट लाईन सुविधा सुरू केली आहे.
बॅलेन्स तपासण्याची गरज नाही
- कोणतेही पेमेंट करण्याआधी यूजर्सला खात्यात किती शिल्लक आहे, हे तपासावे लागायचे. ही सुविधा दिल्याने यूजर्सना बॅलेन्स न तपासता बिनधास्तपणे खरेदी करता येणार आहे.
- प्री-सॅक्शन्ड क्रेडिट लाईन सेवा बचत खाते, ओव्हरड्राफ्ट अकाऊंट, प्रीपेड वॉलेट, रुपे क्रेडिट कार्ड आणि यूपीआय सिस्टीमसोबत लिंक करता येणार आहे.
- ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने यूपीआयवर या सुविधेची घोषणा केली होती. सध्या ही सुविधा काही बँका आणि यूपीआय अॅप्सवरच दिली जाणार आहे.
१०० अब्ज व्यवहारांचे उद्दिष्ट
'यूपीआय'ची वाढती लोकप्रियता बघून आणि त्या माध्यमातून होणारे व्यवहार अधिक सुलभ व्हावे, यासाठी संभाषणात्मक देयक पर्याय 'हॅलो यूपीआय, बिल पे कनेक्ट, यूपीआय टॅप आणि पे आणि यूपीआय लाइट एक्स या नवीन सुविधा दिल्या आहेत. ज्यामुळे यूपीआय दरमहा १०० अब्ज व्यवहारांचे उद्दिष्ट साध्य करण्याची आशा आहे.
नव्या फीचर्समुळे लोकप्रियता कायम
- २०१६ मध्ये एकीकृत अदायगी मंचाच्या स्वरुपात यूपीआयची सुरुवात झाली होती. पेमेंट करण्यासाठी यात मोबाइल नंबर, बँक खात्यांचा क्रमांक, यूपीआय आयडी किंवा यूपीआय क्यूआर कोडची गरज असते,
- एरव्ही शॉपिंग करताना प्रत्येक वेळी युजरला बँक खाते किंवा कार्डावरील क्रमांकाची माहिती द्यावी लागते. यूपीआयमध्ये व्यवहार करताना प्रत्येक वेळी अशी माहिती द्यावी लागत नाही.
- याद्वारे सेवेचा लाभ युजर्सना २४ तास कधीही घेता येतो. पेमेंट करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास यूजर्सना २४४७ हेल्पलाइन नंबर दिलेला असतो.
- सातत्याने नवनव्या फीचर्सची यात भर पडत असल्याने यूजर्समध्ये याची लोकप्रियता कायम आहे.--