मुंबई - जागतिक पत मानांकन संस्था मूडीजने भारताची क्रेडिट रेटिंग म्हणजे जागतिक पत क्रमवारीत सुधारणा केल्याने मुंबई शेअर बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्सने 381 अंकांची उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 109 अंकांची वाढ झाली. 400 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 33,520 अंकांवर पोहोचला होता.
मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2 करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूडीजने पत मानांकनात सुधारणा करुन मोदी सरकारला दिलासा दिला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावरुन विरोधक मोदी सरकारवर अर्थव्यवस्थेचे नुकसान केल्याचे आरोप करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मूडीजने रेटिंगमध्ये केलेली सुधारणा भाजपा सरकारच्या पथ्यावर पडणारी आहे.
"भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.