Join us  

Moodys Investor Service: “भारताचा विकासदर चालु आर्थिक वर्षात ७.७ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर येईल”: मूडीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 3:09 PM

वाढती महागाई आणि व्याजरदवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

Moodys Investor Service: गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने होणारी इंधनदरवाढ, गॅसदरवाढ, वाढती महागाई यांमुळे देशातील जनता त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. यातच आता आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने (Moodys) भारताच्या विकासदराच्या अंदाजाबाबत पुन्हा एकदा नवा दावा केला आहे. जागतिक पातळीवरील मंदीची स्थिती आणि देशांतर्गत आघाडीवर वाढत्या व्याजदरामुळे चालू वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७ टक्के राहील, असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. 

केंद्र सरकारच्या अधिकृत अंदाजानुसार, एप्रिल-जून या तिमाहीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत १३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये विकासदर ४.१० टक्के राहिला होता. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची पडझड पाहता, एकंदर आयात खर्च वाढल्याने त्याचा परिणाम महागाई वाढीवर झाल्याचे सांगितले जात आहे. 

वाढीच्या अंदाजात मूडीजने दुसऱ्यांदा केली कपात

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या २०२२ सालातील वाढीच्या अंदाजात मूडीजने दुसऱ्यांदा सुधारणा केली आहे. मे महिन्यात मूडीजने भारताचा विकासदर ८.८ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये यात सुधारणा करून तो ७.७ टक्क्यांपर्यंत राहील, असे म्हटले होते. मात्र, २०२३-२४ साठी जागतिक अर्थव्यवस्थेविषयक मांडलेल्या दृष्टिक्षेपानुसार, उच्च महागाई दर आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून केली जाणारी व्याजदर वाढ यामुळे अर्थव्यवस्थेची गती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची गतीदेखील मंदावल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर उमटले आहे. यामुळे २०२३ मध्ये भारताचा विकासदर ४.८ टक्के, तर २०२४ मध्ये तो पुन्हा वाढून ६.४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा मूडीजने व्यक्त केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थव्यवस्था