पिढ्यान पिढ्या सोने हे अनिश्चिततेच्या काळात आर्थिक सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. याचे कारण म्हणजे महागाई, समभाग बाजार आणि चलन बाजारातील उतारचढावांचा फारसा परिणाम सोन्यावर होत नाही. सोन्याप्रमाणेच आयुर्विमा हा देखील अडचणीच्या काळात तुमच्या प्रियजनांना सोबत करणारा एक अखेरचा महत्त्वाचा आर्थिक पर्याय आहे. एकवेळ सोन्याचे तेज फिके पडू शकेल, पण सर्वसमावेशक अशा आयुर्विम्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून तिला वेगळी झळाळी मिळते.
सोने खरेदी करताना तुमच्या-माझ्यासारखे ग्राहक, आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. प्रति ग्रॅम किंमत, सोन्याची शुद्धता, गुणवत्तेचे प्रमाणपत्र, बीआयएस हॉलमार्क अशा अनेक बाबींचा विचार आपण करतो. आपल्या पैशांचे सर्वोत्तम मूल्य आपल्याला मिळावे, यासाठी आयुर्विमा खरेदी करताना देखील आपल्याला विविध घटकांचा काळजीपूर्वक विचार करून दीर्घ कालावधीत आर्थिकदृष्ट्या सक्षम करतील, अशा उत्पादनाची निवड करणे गरजेचे आहे.
सोन्याच्या संदर्भात आपण ज्याप्रमाणे कॅरेट, शुद्धता, वजन यांचा विचार करतो, त्याचप्रमाणे योग्य आयुर्विमा खरेदी करणे शक्य व्हावे, यासाठी पुढील निकषांचा विचार करावा.
दावा भरपाई गुणोत्तर – विश्वासार्हतेचे अंतिम मानक
ज्याप्रमाणे सोन्याच्या खरेपणासाठी हॉलमार्कसारख्या मानकाचा वापर केला जातो, आयुर्विमा कंपनीच्या बाबतीत दाव्यांच्या भरपाईचे प्रमाण हे त्यांच्या विश्वासार्हतेचे प्रतीक असते. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या कंपनीने एका विशिष्ट कालावधीत त्यांना प्राप्त झालेल्या दाव्यांच्या तुलनेत प्रत्यक्षात किती प्रकरणांमध्ये भरपाईची रक्कम दिली, याचे गुणोत्तर म्हणजे दावा भरपाई गुणोत्तर. उदाहरणार्थ – एखाद्या कंपनीला एक हजार दावे प्राप्त झाले आणि त्यापैकी ९७० प्रकरणांमध्ये भरपाईची रक्कम देण्यात आली, तर त्या कंपनीचे दावा भरपाई गुणोत्तर ९७ टक्के असते.
हे दावा भरपाई गुणोत्तर जितके जास्त, तितके त्या कंपनीकडून भरपाई मिळण्याची शक्यता अधिक. यातून कंपनीच्या अंडररायटिंग आणि विक्री प्रक्रियेची गुणवत्ताही दिसून येते. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्यांचे दावा भरपाई गुणोत्तर अधिक असते, त्या कंपन्या अधिक कार्यक्षम समजल्या जातात, कारण त्यावरून या कंपन्यांची त्यांच्या ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते.
आयुर्विमा कंपनीचे ग्राहककेंद्रीत धोरण आणि विश्वासार्हतेचे मानक – नेट प्रमोटर स्कोअर
सोन्याच्या बाबतीत कॅरेट जी भूमिका बजावते, तीच भूमिका आयुर्विम्याच्या बाबतीत नेट प्रमोटर स्कोअर बजावतो. कॅरेटवरून ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धता समजते, त्याचप्रमाणे नेट प्रमोटर स्कोअरवरून ग्राहक कंपनीबाबत किती समाधानी आहेत ते समजते. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची शिफारस आपल्या परिचितांना करण्याचे प्रमाण किती आहे, यावरून नेट प्रमोटर स्कोअर निश्चित होतो. आयुर्विमा क्षेत्रात ग्राहकांच्या निकषांवर कंपनीची एकूण कामगिरी कशी आहे, हे ओळखण्यासाठी या मानकाचा वापर केला जातो. हे मानक म्हणजे एखाद्या कंपनीकडून आयुर्विमा खरेदी करण्यापूर्वी कशा प्रकारची सेवा आपल्याला मिळू शकणार आहे, याचे निदर्शक आहे.
ग्राहकांच्या प्रतिक्रिया, गुणवत्तेचे प्रमाणपत्र सोने खरेदी करताना सर्वोत्कृष्ट सोन्यासाठी आपण त्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात सोनाराचे प्रमाणपत्र वैध मानतो. त्याचप्रमाणे, आयुर्विमा खरेदी करताना त्या आयुर्विम्याच्या प्रत्यक्ष ग्राहकांच्या प्रतिक्रिया तपासणे महत्त्वाचे असते. यामुळे ऑनलाइन ज्या कंपन्यांच्या बाबतीत अत्यंत खराब प्रतिक्रिया आल्या असतील किंवा ग्राहकांच्या असंख्य तक्रारी अद्यापही सोडवल्या गेल्या नसतील, अशा कंपन्यांची माहिती मिळून या कंपन्यांपासून दूर राहाणे शक्य होईल. यापैकी सगळ्याच प्रतिक्रिया खऱ्या असतील असे नाही; परंतु एखाद्या कंपनींच्या संदर्भात बेसुमार तक्रारी दिसून येत असतील तर तो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निकष असायला हवा.
दावा भरपाई गुणोत्तर, नेट प्रमोटर स्कोअर आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया हे घटक आयुर्विमा कंपनीची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेतच, परंतु, केवळ तेवढेच पुरेसे नाही. या निकषांखेरीज सध्याच्या युगात डिजिटल माध्यमाचा अचूक वापर करणाऱ्या, विविध विमा उत्पादने ग्राहकांना सहज उपलब्ध करून देणाऱ्या, तुमच्या सोयीची वेळ आणि माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या आणि आर्थिक सुरक्षिततेच्या आवश्यकतेच्या प्रसारावर भर देणाऱ्या कंपनीची जाणीवपूर्वक निवड करणे आवश्यक आहे.
- व्ही. विश्वानंद, उप व्यवस्थापकीय संचालक, मॅक्स लाइफ इन्शुरन्स