Join us

कार घेणे आणखी महाग, महिंद्रानंतर मारुतीकडून किमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:11 PM

कोविड-१९ साथ आणि त्यानंतर उद्भवलेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी वाहन कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या किमती वाढत आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेलच्या कारच्या किमती ०.९ टक्के ते १.९ टक्के वाढल्या आहेत. महिंद्रा कंपनीनेही आपल्या वाहनांच्या किमती २.५ टक्क्यांपर्यंत वाढविल्या आहेत.उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. सर्व वाहनांच्या किमतीत सरासरी १.३ टक्के (दिल्लीतील शोरूम किंमत) वाढ झाली आहे. मारुती सुझुकीने जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ या काळात किमतीत सुमारे ८.८ टक्के वाढ केली आहे.पोलाद, तांबे, ॲल्युमिनियम या धातूंसह अनेक वस्तूंच्या किमती महागल्यामुळे कार उत्पादनाचा खर्च महागला आहे. त्यामुळे किमती वाढविणे भाग पडले, असे कंपनीने म्हटले आहे.युद्धाचा मोठा फटका -कोविड-१९ साथ आणि त्यानंतर उद्भवलेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी वाहन कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या किमती वाढत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला मारुती सुझुकीने आपल्या सर्व मॉडेल रेंजच्या किमती वाढविल्या होत्या.

कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ गेल्या आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्रानेही आपल्या वाहनांच्या किमती २.५ टक्क्यांपर्यंत वाढविल्या होत्या. ही वाढ सर्व मॉडेलांवर लागू आहे. कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. या दरवाढीनंतर कंपनीच्या गाड्यांच्या एक्स-शोरूम किमतीत १० हजार ते ६३ हजार रुपये अशी वाढ होईल. स्टील, ॲल्युमिनियम, पॅलाडिअम आणि अन्य कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे गाड्यांच्या किमतीत वाढ करणे आवश्यकच होते, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :मारुतीकार