दिवाळीपेक्षा अधिक फटाके देशात वाजणार , प्राणप्रतिष्ठेसाठी ४०० कोटींचा बाजार सज्ज
नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिवाळीपेक्षाही अधिक फटाके विकले जात आहेत. देशभरात जवळपास ४०० कोटी रुपयांचा फटाका बाजार त्यासाठी सजला आहे. तामिळनाडूतील शिवकाशी येथील प्रसिद्ध फटाके उत्पादकांची संघटना ‘शिवकाशी फायर वर्क्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या माहितीनुसार, एकट्या अयोध्येत २५० कोटी रुपयांचा फटाके बाजार तयार आहे.
‘ऑल इंडिया फायर वर्क्स ट्रेडर्स असोसिएशन’ने म्हटले की, या सोहळ्यासाठी उभा राहिलेला फटाक्यांचा बाजार दिवाळीपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. ‘इंडियन फायर वर्क्स’चे सचिव अनुप जायस्वाल यांनी सांगितले की, उत्तर भारतासह पश्चिम बंगालमधील फटाका उत्पादकांचे १०० ते १५० कोटी रुपयांचे फटाके विकले जातील.
उत्पादकांमध्ये चैतन्य
‘एसएफएमए’चे पदाधिकारी संजय मुरुगन यांनी सांगितले की, फटाक्यावरील प्रतिबंधामुळे दिवाळीचा फटाका बाजार थंड
राहिला आहे.
एकेकाळी एकट्या दिवाळीत ७०० ते ९०० कोटी रुपयांचे फटाके विकले जात असत. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामुळे फटाका बाजारात पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे.
उत्पादकांना २०० ते २५० कोटी रुपयांची, तर देशाच्या इतर भागांतील निर्मात्यांना आणखी १५० कोटी रुपयांची मिळकत होईल, असा अंदाज आहे.