नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा किमान निर्यात मूल्य वाढवून ५०० डॉलर प्रति टन केले आहे. याचाच अर्थ भारतातून आता ५०० डॉलर टनापेक्षा कमी किमतीत निर्यात करता येणार नाही.
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या किमतीत भरमसाट वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून गेल्या महिन्यात सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य ३०० डॉलर प्रति टन केले होते. त्याआधी मार्च महिन्यात मनमोहनसिंग सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्याची अट काढून निर्यात खुली केली होती. त्यामुळे निर्यात वाढून देशांतर्गत किमती वाढल्या होत्या. त्यातच पाऊस लांबल्यामुळे कांदा दरवाढीत आणखी भर पडली.
राष्ट्रीय राजधानीत कांद्याचा किरकोळ विक्रीचा भाव सध्या २५.३० रुपये किलो झाला आहे. त्याचवेळी ठोक बाजारात कांदा १८.५० रुपये किलो आहे.
सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कांद्याच्या निर्यात मूल्यात वाढ करण्याचा निर्णय ३० जून रोजी झालेल्या आंतर मंत्रालयीन बैठकीत घेण्यात आला. एका सरकारी निवेदनात म्हटले आहे की, कांद्याच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत होणारी वाढ रोखण्याच्या मुख्य उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मान्सूनला विलंब झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत कांदा उपलब्धतेवर दबाव आहे. कांद्याची उपलब्धता वाढावी यासाठी सरकारने किमान निर्यात मूल्य ५०० डॉलर प्रति टन केले आहे.
चलनाचा विनिमय दर लक्षात घेता साधारणत: ३० रुपये किलो किमान निर्यात मूल्य असेल. म्हणजेच ३० रुपये किलोपेक्षा कमी दराने कांद्याची निर्यात करता येणार नाही.
अलीकडे काही वर्षांत कांदा हा संवेदनक्षम राजकीय विषय झाला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
कांद्याच्या निर्यात मूल्यात केंद्राने केली आणखी वाढ
कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा किमान निर्यात मूल्य वाढवून ५०० डॉलर प्रति टन केले आहे.
By admin | Published: July 3, 2014 05:19 AM2014-07-03T05:19:07+5:302014-07-03T05:19:07+5:30