Join us

अधिक व्याज! गडकरी करणार गरिबांना श्रीमंत, रस्त्यांसाठी छोट्या गुंतवणूकदारांकडून निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:45 AM

महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरद्वारे आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी सांगितले की, मी आता श्रीमंतांना आणखी श्रीमंत करू इच्छित नाही.

नवी दिल्ली : रस्त्यांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी विदेशी गुंतवणूकदारांकडून पैसा घेण्याऐवजी आपल्याच देशातील छोट्या गुंतवणूकदारांकडून निधी उभा केला जाईल, तसेच या गुंतवणूकदारांना घसघशीत ८ टक्के दराने वार्षिक व्याज दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.गडकरी यांनी सांगितले की, छोट्या वस्त्या आणि रेल्वे क्रॉसिंग्जवर ओव्हर ब्रिज उभारण्याच्या ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. आपला विभाग ५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे सध्या करतो.महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरद्वारे आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी सांगितले की, मी आता श्रीमंतांना आणखी श्रीमंत करू इच्छित नाही. आता मी शेतकरी, शेतमजूर, कॉन्स्टेबल, क्लर्क आणि सरकारी कर्मचारी यासारख्या छोट्या गुंतवणूकदारांकडून निधी उभा करू इच्छितो. या योजनेत छोटे गुंतवणूकदार कमीत कमी १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. हा निधी रस्ते प्रकल्पांसाठी वापरला जाईल. यावर वार्षिक ८ टक्के दराने व्याज मिळेल. बँका सध्या केवळ ४.५ ते ५.० टक्के व्याज देतात. त्या तुलनेत सरकारने देऊ केलेले व्याज आकर्षक आहे, तसेच या गुंतवणुकीवर सार्वभौम हमीही आहे. ही योजना सध्या बाजार नियामक सेबीकडे प्रलंबित आहे. तेथून मंजुरी मिळताच ती सुरू केली जाईल.

कॅनडातील निवृत्त वेतनधारकांची गुंतवणूकगडकरी यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत ऑस्ट्रेलिया व मॅक्वेरी तथा कॅनडा यांसारख्या देशांतील निवृत्त वेतनधारकांनी भारतात गुंतवणूक केली आहे. मात्र, आता आपण आपल्या गरजेचा निधी स्वत:च उभा करणेही आवश्यक आहे. 

टॅग्स :नितीन गडकरीगुंतवणूकभाजपा