- प्रसाद गो. जोशीजागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरण, भारतीय बाजारामध्ये होत असलेली चांगली गुंतवणूक अशा आशादायक वातावरणामध्ये सन २०१७ ची अखेर झाली.वर्षअखेरीस दोन्ही निर्देशांकांनी नवीन उंची गाठून गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राखला आहे. कॅलेंडर वर्षामध्ये बाजाराने दिलेली वाढ ही तीन वर्षांमधील चांगली असल्याने पुढील वर्षामध्ये बाजार सकारात्मक राहण्याची चिन्हे दृगोचर होत आहेत.मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. निर्देशांक ३४१३७.९७ ते ३३७५२.०३ अंशांदरम्यान हेलकावत ११६.५३ अंशांची वाढ दाखवित ३४०५६.८३ अंशांवर बंद झाला. बंद निर्देशांकाचा हा उच्चांक आहे. याआधी संवेदनशील निर्देशांकाने ३४१५७.९७ अंश अशी सर्वाधिक उंची गाठली आहे.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही तेजी दिसून आली. सप्ताहामध्ये तो ४५.२५ अंशांनी वाढून १०५३०.७० अशा विक्रमी उंचीवर बंद झाला. तत्पूर्वी त्याने १०५५२.४० अशी उंची गाठली होती. बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही झालेली वाढ ही अधिक प्रमाणात राहिली. मिडकॅप निर्देशांक २४८.६२ अंशांनी वाढून १७८२२.४० अंशांवर तर स्मॉलकॅप १९२३०.७२ (वाढ २३९.५२) अंशांवर बंद झाला.तेलाच्या वाढत्या किंमती आणि वाढती वित्तीय तूट यामुळे चिंतीत झालेल्या परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारामधून डिसेंबर महिन्यात ५९०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. गेले काही महिने या संस्था सातत्याने विक्री करीत आहेत.परकीय चलन गंगाजळीभारताच्या परकीय चलन गंगाजळीने २२ डिसेंबर रोजी नवीन उच्चांकी झेप घेतली आहे. या दिवशी गंगाजळीमध्ये ४०४.९२१ अब्ज अमेरिकन डॉलरची शिल्लक होती. याआधी ४०१.३८५ अब्ज अमेरिकन डॉलरचा उच्चांक होता. गंगाजळीमध्ये समावेश असलेल्या मालमत्तांचे बाजारमूल्य वाढल्याने ही वाढ झाली आहे.संवेदनशील निर्देशांकामध्ये सुमारे २८ टक्के वाढकॅलेंडर वर्षामध्ये भारतीय शेअर बाजाराची जोरदार आगेकूच झालेली बघावयास मिळाली. बाजार निर्देशांकांनी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वाढ दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने वर्षभरामध्ये ७६५०.३० अंश म्हणजेच २७.८ टक्के वाढ दिली आहे. वर्षभरामध्ये निर्देशांकाने २६ हजारांपासून ३४ हजारापर्यंत वाढ दिली आहे.याआधीच्या वर्षामध्ये हा निर्देशांक १.९ टक्के वाढला होता.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने अधिक चांगली कामगिरी नोंदविली आहे. वर्षभरामध्ये हा निर्देशांक २३४४.९० अंश म्हणजेच २८.५ टक्कयांनी (आधीच्या वर्षी ३ टक्के) वाढला आहे.मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तर जोरदार वाढ झाली. हे निर्देशांक वर्षभरामध्ये अनुक्रमे ४८.३ आणि ५९.८ टक्कयांनी वाढले आहेत.
वर्षअखेरीला निर्देशांकांनी गाठली आणखी नवीन उंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 2:16 AM