Join us

१.३ कोटी लोकांची कमाई ६५ कोटी नागरिकांपेक्षा दुप्पट; वर्षभरात गरिबीतही झाली मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:18 AM

भारतामध्ये दररोज १५० रुपयेही कमावू न शकणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षात ६ कोटींनी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :भारतामध्ये दररोज १५० रुपयेही कमावू न शकणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षात ६ कोटींनी वाढली आहे. त्यातील गरिबांची संख्या १३.४ कोटींपर्यंत पोहोचली आहे. देशातील केवळ १.३ कोटी लोकांची कमाई ६५ कोटी लोकांपेक्षा दुप्पट आहे. गरिबीचे प्रमाण वर्षभरात दुप्पट झाले असल्याचा निष्कर्ष एका पाहणीतून काढण्यात आला.

पॅरिस येथील वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब या संस्थेने जगातील आर्थिक विषमतेबद्दल एक पाहणी करून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, आर्थिक विषमता ही जुनी समस्या आहे. कोरोना साथीच्या काळात या विषमतेची दरी भारतासह काही देशांमध्ये आणखी वाढली आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. 

भारतातील सर्वाधिक १० श्रीमंत व्यक्तींची सरासरी वार्षिक कमाई गरिबांपेक्षा कित्येक पट अधिक आहे. ५० टक्के गरीब लोकांची २०२१ मधील सरासरी वार्षिक कमाई ५३,६१० रुपये इतकी होती. 

देशातील गरीब व श्रीमंतांमधील आर्थिक विषमतेचे प्रमाण सुमारे २० पट आहे. देशाचे सरासरी वार्षिक उत्पन्न २ लाख ४ हजार २०० रुपये आहे. मात्र ५० टक्के गरिबांचे उत्पन्न त्यापेक्षाही कमी आहे. देशाच्या एकूण वार्षिक उत्पन्नात श्रीमंतांचा वाटा २२ टक्के आहे. 

भारतातील सर्वाधिक १० श्रीमंत उद्योगपतींचा विचार केला तर त्यांच्या उत्पन्नाचा वाटा ५७ टक्के होतो, तर ५० टक्के गरिबांचा देशातील वार्षिक उत्पन्नातील हिस्सा फक्त १३ टक्के आहे. ही आकडेवारी पाहता भारतात आर्थिक विषमता कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. असे मत या पहाणी अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

साथीचा सर्वाधिक तडाखा मध्यमवर्गाला

भारतात १९७४ सालानंतर ४५ वर्षांनी पुन्हा एकदा गरिबांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. प्यु रिसर्च सेंटरच्या एका अहवालात म्हटले होते की, कोरोना साथीचा सर्वात जास्त तडाखा मध्यमवर्गाला बसला आहे. त्यामुळे भारतातील एक तृतीयांश मध्यमवर्ग गरिबीच्या खाईत ढकलला गेला. 

टॅग्स :भारतअर्थव्यवस्था