शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. परंतु असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही शेअर्सनं आपल्य गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. त्यापैकीच एक बोंदडा इंजिनिअरिंगच्या (Bondada Engineering) शेअर्सनं अवघ्या 8 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. कंपनीचा IPO ऑगस्ट 2023 मध्ये 75 रुपयांच्या किमतीवर आला होता. 28 मार्च 2024 रोजी बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सनं 850 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या शेअर्सनं गेल्या 8 महिन्यांत गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 949.95 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 142.50 रुपये आहे.
75 वरून 850 पार पोहोचला शेअर
बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि तो 22 ऑगस्टपर्यंत खुला राहिला. कंपनीचा IPO 75 रुपये किमतीत आला. कंपनीचे शेअर्स 30 ऑगस्ट 2023 रोजी 142.50 रुपयांच्या किमतीवर शेअर बाजारात लिस्ट झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासून बोंदडा इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. इश्यू प्राईजच्या तुलनेत कंपनीच्या शेअर्समध्ये 1037 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुरुवार, 28 मार्च 2024 रोजी बोंदडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 852.15 रुपयांवर बंद झाले.
112 टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब
बोंदडा इंजिनिअरिंगचा आयपीओ एकूण 112.28 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 100.05 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, आयपीओच्या इतर कॅटेगरीमध्ये 115.46 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओची साईज 42.72 कोटी रुपये होती. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 86 टक्के होता, जो आता 63.33 टक्क्यांवर आला आहे.
(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)