PM Vishwakarma Yojana : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. याची अंमलबजावणी १७ सप्टेंबर २०२३ पासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं. यावर्षी १० नोव्हेंबरपर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर सुमारे ३४ हजार व्यक्तींनी प्रशिक्षण सुरू केले आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यांनी ही माहिती दिली.
२३ लाखांहून अधिक नोंदणी
नवभारत टाइम्स डिजिटलला दिलेल्या विशेष मुलाखतीत तिवारी यांनी १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २३,३१,८४९ व्यक्तींनी नोंदणी केल्याचं म्हटलं. तसंच या सर्वांसाठी पीएमव्ही आयडी देण्यात आले आहेत. त्यापैकी १० लाख २२ हजार २४४ जणांनी प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. सद्यस्थितीत ३३ हजार ९१२ जण विविध प्रशिक्षण केंद्रांवर विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेत असल्याचंही ते म्हणाले.
कोणत्या राज्यात प्रशिक्षण
सध्या देशभरातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५६७ जिल्ह्यांमध्ये सर्व १० व्यवसायांमध्ये ३४३७ प्रशिक्षण केंद्रं सुरू आहेत. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूनं अद्याप या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली नाही.
प्रशिक्षणानंतर कर्ज सुविधा
पीएम विश्वकर्मा योजनेत सरकार लोकांना विनागॅरंटी स्वस्त व्याजदरात कर्ज देते. इतकंच नाही तर १५००० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. या योजनेत लोकांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज केवळ ५ टक्के व्याजदरानं दिलं जातं. योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जातं. या योजनेत १८ पारंपारिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं.
या योजनेत लोकांना १८ पारंपारिक कौशल्य व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिलं जातं. १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज कसा करावा?
पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in जाऊन केला जाऊ शकतो. त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँकेचं पासबुक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.