Join us

लोक एलपीजी सिलिंडर भरेनात! करोडोंनी वर्षात एकदाच बुक केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 10:29 AM

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत ही माहिती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) तब्बल ४.१३ कोटी लाभार्थींनी एकदाही सिलिंडर नव्याने भरला नाही, तर ७.६७ कोटी लाभार्थींनी पाच वर्षांत केवळ एकदाच सिलिंडर भरला आहे. गॅसच्या किमती गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाल्याने नागरिकांना महागाईची झळ जाणवू लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत ही माहिती दिली आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींची माहिती मागवली होती. त्याला तेली यांनी उत्तर दिले.केंद्रीय मंत्री म्हणाले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण ३०.५३ कोटी घरगुती ग्राहकांपैकी २.११ कोटी घरगुती एलपीजी ग्राहकांनी एकही सिलिंडर रिफील केला नाही, तर २.९१ कोटी घरगुती एलपीजी ग्राहकांनी फक्त एकदाच सिलिंडर रिफील केले.

सरकारकडून सबसिडी किती? n गेल्या काही वर्षांत गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनी पुन्हा एकदा चुलीचा पर्याय निवडला आहे. n सिलिंडरवर मिळणारी सबसिडी आता सरकारने शून्यावर आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसत होता. n विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे २१ मे २०२२ पासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसाठी प्रतिसिलिंडर २०० रुपयांची सबसिडी पुन्हा जाहीर केली आहे.

कुणासाठी आहे उज्ज्वला योजना?२०१६ मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना, विशेषत: लाकूड, कोळसा, शेण, इत्यादी पारंपरिक इंधन वापरणाऱ्यांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन पुरवण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमवायू) ही एक प्रमुख योजना म्हणून सुरू करण्यात आली होती.

टॅग्स :गॅस सिलेंडर