Budget 2023-2024: पंतप्रधान मोदी सरकारच्या या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पातून देशातील सामान्य जनतेला, व्यवसायिकांना, उद्योजकांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. अलीकडेच देश कोरोनाच्या तडाख्यातून सावरताना दिसत आहे. तर, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताकडे पाहत आहे. त्यामुळे भारताच्या सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाकडे जगाचे लक्ष लागले आहे. यातच बजेटसाठी संसदेत जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी देवाला साकडे घातले.
निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी केंद्र सरकार देशातील आम जनतेला काय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून शेतकरी, हेल्थ सेक्टर, उद्योग आणि नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होतात याकडे देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. बजेटला जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी देवपूजा करून देवाचा आशीर्वाद घेतला आणि संसदेकडे निघाले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले...
अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? असा प्रश्न भागवत कराड यांना विचारण्यात आला. त्यावर, तूर्तास मी कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही. मी एवढेच सांगतो की, आता बजेट सादर होणार आहे. त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे भागवत कराड म्हणाले. तसेच कोरोनानंतर देशाची रिकव्हरी चांगली झाली आहे. इकॉनॉमी सर्व्हे पाहिला तर प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती झाली असल्याचे दिसून येते. इतर देशाच्या तुलनेत आपली प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले. तेव्हा आपला देश १०व्या स्थानी होता. तो आता पाचव्या स्थानी आला आहे, असे कराड यांनी नमूद केले.
दरम्यान, बजेटपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"