Adani Group: सुप्रसिद्ध अदानी ग्रूपला मोठा धक्का बसला आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांची डायरोक्टोरेट ऑफ रेव्हीन्यू इंटेलिजन्स (DRI) आणि सेबीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी संसदेत दिली आहे. आर्थिक नियमनासंबंधी या कंपन्यांची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. संसदेत याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये २.४५ टक्क्यांची, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये ३.५३ टक्के, अदानी एन्टरप्रायझेसमध्ये ३ टक्के, अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये १.७५ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५ टक्के आणि अदानी पवारच्या शेअर्समध्ये ३.५५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नुकतेच मोठे बदल करण्यात आले होते. यात किशन राव आणि पंकज चौधरी यांच्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी अनुराग ठाकूर यांच्याकडे हे मंत्रिपद होतं. आता अनुराग ठाकूर यांना प्रमोशन देण्यात आलं असून त्यांना क्रीडा व माहिती प्रसारण मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. नवनिर्वाचित केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी आज संसदेत अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी सेबी आणि डीआरआयच्या माध्यमातून सुरू आहे.