Join us

सर्वात स्वस्त स्मार्ट फोन वादाच्या घेऱ्यात

By admin | Published: February 19, 2016 3:07 AM

अवघ्या २५१ रुपयांमध्ये येऊ घातलेला जगातील सर्वाधिक स्वस्त स्मार्ट फोन लाँचिंगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा असल्याचा आरोप

नवी दिल्ली/ नितीन अग्रवाल : अवघ्या २५१ रुपयांमध्ये येऊ घातलेला जगातील सर्वाधिक स्वस्त स्मार्ट फोन लाँचिंगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा असल्याचा आरोप करीत तपासाची मागणी केली आहे.दूरसंचार नियामक प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्रात खा. सोमय्या यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सदर कंपनीने स्मार्ट फोनचे उत्पादन सुरू केलेले नाही. त्यासाठी आवश्यक ती परवानगी सरकारकडून मिळविली नाही. केवळ काही महिन्यांपूर्वी या कंपनीची नोंदणी झाली आहे. लोकांकडून पैसा गोळा करून ही कंपनी फरारही होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी वर्तवली. दुसरीकडे मोबाईल हँडसेट उद्योगातील इंडियन सेल्युलर असोसिएशन या संघटनेने अवघ्या २५१ रुपयांच्या स्मार्ट फोनचे सादरीकरण झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या संघटनेने दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून या प्रकरणी सखोल तपासाची मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सबसिडीच्या दरातील हँडसेटची किंमत ३५०० रुपयांपेक्षा कमी राहूच शकत नाही, असा दावाही या संघटनेने केला. दुसरीकडे सदर कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात विक्री आणि करातून मिळणाऱ्या सवलतींमुळे स्मार्ट फोन फक्त २५१ रुपयांमध्ये उपलब्ध करवून देणे शक्य होईल. आॅनलाईन बुकिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व नोंदणी जूनपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे स्पष्ट केले. बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी या स्मार्ट फोनचे दिल्लीत लाँचिंग केले. हा हँडसेट पूर्णपणे स्वदेशनिर्मित असून त्यासाठी सरकारकडून कोणतीही मदत घेण्यात आली नसल्याचे या कंपनीने सांगितले.