वॉशिंग्टन : गेल्या ११ वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील २१ लाख भारतीयांनी अमेरिकेच्या एच-१ बी व्हिसासाठी अर्ज केल्याचे अमेरिकेच्या अधिकृत अहवालात म्हटले आहे.
युनायटेड स्टेट्स सिटिझन्स अॅण्ड इमिग्रेशन सर्विसेसने (यूएससीआयएस) आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. व्हिसासाठी अर्ज करणारे उच्च कौशल्य असलेले नसतात, हे म्हणणे या अहवालात अमान्य करण्यात आले आहे. गेल्या ११ वर्षांतील एच-१ बी व्हिसाधारकांचे सरासरी वेतन ९२,३१७ डॉलर असून, त्यापैकी बहुतांश तंत्रज्ञ स्नातकोत्तर (मास्टर) अथवा स्नातक (बॅचलर) पदवीधारक आहेत.
अहवालात म्हटले आहे की, २00७ ते जून २0१७ पर्यंत यूएससीआयएसकडे ३४ लाख अर्ज एच-१ बी व्हिसासाठी आले. त्यापैकी भारतातून २१ लाख अर्ज आले. या काळात अमेरिकेने २६ लाख लोकांना व्हिसा दिला. तसेच २00७ ते २0१७ या काळात भारतापाठोपाठ चीनकडून २,९६,३१३ व्हिसा अर्ज मिळाले, फिलिपीन्सकडून ८५,९१८, दक्षिण कोरियाकडून ७७,३५९ आणि कॅनडाकडून ६८,२२८ व्हिसा अर्ज मिळाले.
अहवालानुसार, सर्वाधिक २३ लाख एच-१ बी व्हिसा २५ ते ३४ या वयोगटातील लोकांना मिळाला. २0 लाख व्हिसा संगणक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना मिळाला. त्याखालोखाल वास्तुविशारद, अभियांत्रिकी आणि मोजणी (३,१८,६७0), शिक्षण (२,४४,000), प्रशासकीय तज्ज्ञ (२,४५,000), औषधी आणि आरोग्य (१,८५,000) या क्षेत्रातील लोकांनाही एच-१ बी व्हिसा देण्यात आला.
निवृत्तीनंतर एच-१ बी व्हिसासाठी अर्ज केल्याची उदाहरणेही मोठ्या प्रमाणात आहेत. या संपूर्ण ११ वर्षांच्या काळात ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या २ हजार विदेशी नागरिकांना एच-१ बी व्हिसा मंजूर करण्यात आला. यंदा ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १२२ विदेशी नागरिकांना एच-१ बी व्हिसा देण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांत कस्टम कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सर्व्हिसेस क्षेत्रात सर्वाधिक ९,९९,९0१ एच-१ बी व्हिसा देण्यात आले. त्याखालोखाल २,८७,000 व्हिसा कॉम्प्युटर सिस्टिम्स डिझाइन सर्व्हिसेस क्षेत्राला देण्यात आले. महाविद्यालय, विद्यापीठे आणि व्यावसायिक शाळांना २२,९00 व्हिसा मंजूर केले गेले.
एच-१ बी व्हिसासाठी भारतातून सर्वाधिक अर्ज
गेल्या ११ वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील २१ लाख भारतीयांनी अमेरिकेच्या एच-१ बी व्हिसासाठी अर्ज केल्याचे अमेरिकेच्या अधिकृत अहवालात म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:38 AM2017-08-03T00:38:31+5:302017-08-03T00:38:40+5:30