Join us

"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 4:33 PM

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले

Uday Kotak : आर्थिक उद्योगातील दिग्गज आणि जेष्ठ बँकर उदय कोटक यांनी बजाज समूहाचे माजी मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. उद्योगपती सत्तेत बसलेल्यांसमोर बोलणे टाळतात, असं म्हणत उदय कोटक यांनी दिवंगत राहुल बजाज यांचे कौतुक केलं. बहुसंख्य व्यापारी हे सत्तेत असलेल्यांशी खरे बोलताना काळजी घेत असतात असं  उदय कोटक यांनी म्हटलं आहे.  बहुतेक व्यापारी सत्तेत असलेल्यांसमोर सत्य बोलताना सावध असतात आणि समर्पक मुद्द्यांवर आपले मत मांडत नाहीत, असं म्हणत कोटक यांनी राहुल बजाज यांच्या विधानाची आठवण करुन दिली. दिवंगत राहूल बजाज यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपले मत व्यक्त केले होते, असेही उदय कोटक यांनी म्हटलं.

सोमवारी बजाज समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत राहुल बजाज यांच्या जीवनावर आधारित 'हमारा राहुल' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या पुस्तकाचे प्रकाशन करताना उदय कोटक यांनी राहुल बजाज यांच्या स्पष्टवक्तेपणाची आठवण करुन दिली. राहुल बजाज यांनी अनेक वेळा बोलण्याची त्यांची क्षमता कशी दाखवली होती याबद्दलही उदय कोटक यांनी सांगितले. उदय कोटक यांच्यासह इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनीही राहुल बजाज यांचे कौतुक केले. नारायण मूर्ती यांनी राहुल बजाज यांचे एक धाडसी आणि प्रामाणिक व्यक्ती असे वर्णन केले. बजाज यांनी खुल्या मनाची वृत्ती दाखवली होती असेही नारायण मूर्ती म्हणाले.

काय म्हणाले उदय कोटक?

यावेळी कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी एका कार्यक्रमाचा उल्लेख केला ज्यामध्ये राहुल बजाज यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शक्तिशाली मंत्र्यांसमोर खुलेपणाने आपले मत मांडले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत व्यावसायिकांमधल्या बोलण्याच्या भीतीबद्दल राहुल बजाज  यांनी चिंता व्यक्त केली होती. "त्यांनी ( राहुल बजाज) ती गोष्ट म्हटंली जे बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. हे तर सर्वांच्याच मनात होते. सत्य बोलायला ते कधीच घाबरले नाहीत. राहुल बजाज यांना भारतीय उद्योग जगताचे आयकॉन म्हणून अभिवादन करावे लागेल कारण सत्य बोलण्यास ते कधीही घाबरले नाहीत," असे उदय कोटक म्हणाले.

काय म्हणाले राहुल बजाज?

२०१९ साली इकनॉमिक टाइम्सच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देशातील आघाडीच्या उद्योजकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मंत्री पीयूष गोयल हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी, "सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२ च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो,” असे राहुल बजाज यांनी म्हटलं होतं. राहुल बजाज यांच्या  प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, 'कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मोदी सरकारवर माध्यमांमधून कायमच टीका होत राहिली आहे.'

दरम्यान, बजाज ग्रुपचे संस्थापक राहुल बजाज यांचे २०२२ मध्ये निधन झाले होते. ते ८३ वर्षांचे होते. जवळजवळ पाच दशकं त्यांनी कंपनीचं नेतृत्व केलं होतं.  २००१ मध्ये त्यांना उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कोरोना काळात त्यांनी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

टॅग्स :व्यवसायबजाज ऑटोमोबाइलअमित शाहनरेंद्र मोदी