Raghuram Rajan On Cryptocurrency : सध्या अनेक जण क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करताना दिसत आहे. परंतु रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन (Dr. Raghuram Rajan) यांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात एक इशारा दिला आहे. चिटफंडप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीचाही फुगाही लवकरच फुटेल आणि यातील बहुतांश करन्सीसचं अस्तित्व संपेल. सध्या जगभरात ६ हजार क्रिप्टोकरन्सीस आहे आणि त्यातील केवळ एक किंवा दोनच शिल्लक राहतील असं राजन म्हणाले.
"बहुतांश क्रिप्टोकरन्सीसचं अस्तित्व यामुळेच संपेल कारण कोणीतरी याची माहिती नसलेलीच व्यक्ती ते खरेदी करू इच्छित आहे. क्रिप्टोकरन्सीमुळे देशात तशाच समस्या निर्माण होतील, जशा चिटफंडमुळे झाल्या होत्या. चिटफंड लोकांकडून पैसे घेतात आणि गायब होतात. क्रिप्टो अॅसेट्स ठेवणाऱ्या अनेकांना येणाऱ्या दिवसांमध्ये समस्यांना समोरं जावं लागेल," असंही राजन यांनी स्पष्ट केलं. CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. रघुराम राजन यांनी यावर भाष्य केलं.
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी
"बहुतांश क्रिप्टो करन्सीजचं कोणतंही स्थायी मूल्य नाही. परंतु पेमेंट्स खासकरून क्रॉस बॉर्डर पेमेंट्ससाठी काही क्रिप्टोचा वापर सुरू राहू शकतोय ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारला याला देशात पुढे नेण्याची परवानगी द्यायला हवी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला सरकारडून परवानगी दिली जाऊ शकते, असं सांगायला हवं," असं राजन म्हणाले.
किती लोकांकडे आहे क्रिप्टोकरन्सी?
भारतासह संपूर्ण जगभरात क्रिप्टोकरन्सीचं क्रेझ गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या क्षेत्रातील सूत्रांनुसार भारतात १० कोटींपेक्षा अधिक लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे. यामध्ये तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. भारतात क्रिप्टो करन्सी असलेल्यांची संख्या ही अमेरिकेपेक्षा अधिक आहे. परंतु होल्डिंग व्हॅल्यूप्रमाणे अमेरिका यात पुढे आहे.