लंडन - कोरोना महामारीच्या काळात देशातील पहिली कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सीरम इंस्टीट्युचे सर्वेसर्वा आदर पुनावाला यांनी नुकतेच लंडनमध्ये महागडे घर खरेदी केलं आहे. लंडनमध्ये विक्री झालेलं यंदाचं सर्वात महागडं घर म्हणून भारतीय उद्योगपतींची ही खरेदी मानली जाते. २५,००० स्क्वेअर फूट एवढं विस्तीर्ण असा या घराचा संपूर्ण परिसर आहे. हवेलीसारख्या या घरात अनेक आकर्षक वस्तूंची सजावट असल्यानेच पुनावाल यांच्या मनात हे खरं खरेदी करण्याचा मोह झाला. विशेष म्हणजे हे नवं घर नसून १९२० साली बांधण्यात आलं आहे.
आदर पुनावाला यांनी खरेदी केलेलं हे घर लंडमधील हाईड पार्कजवळ असून एबरकोनवे हाऊस असं या घराचं नाव आहे. भारताचे व्हॅक्सीन प्रिंस अशी ओळख असलेले आदर पुनावाला हे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, मेफेयर हवेली म्हणून प्रसिद्ध असलेल्या या घरासाठी १३८ मिलियन्स पाऊंड म्हणजे भारतीय चलनानुसार १४४६ कोटी रुपये किंमत देण्यात आली आहे. पुनावाला यांची युके स्थित सहायक कंपनी सीरम लाइफ सायंसेसद्वारे ही संपत्ती अधिग्रहण करण्यात येणार आहे. तर, या कंपनीच्या कामासाठी आणि कार्यक्रमासाठीच हे घर वापरात येईल, अशी माहिती आहे.
लंडनमधील दुसऱ्या क्रमांकाची महागडी खरेदी
दरम्यान, लंडनमध्ये विक्री करण्यात आलेलं हे यंदाच्या वर्षातील सर्वात महागडं घर ठरलं आहे. तर, आजपर्यंतच्या घरखरेदी व्यवहारातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागडं घर ठरलं आहे. यापूर्वी २-८ए रटलँड गेट हे घर सर्वात महाग खरेदी करण्यात आलं होतं. जानेवारी २०२०२ मध्ये पहिला रेकॉर्ड मोडून २१० मिलियन्स यूरोमध्ये ही संपत्ती विकण्यात आली होती. आता, पुनावाला यांनी घेतलेलं एबरकोनवे हाउस हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनावाला कुटुंबाची एकूण संपत्ती २०२१ मध्ये अंदाजे १६.६ बिलियन डॉलर्स म्हणजेज सुमारे १.३८ लाख कोटी रुपये एवढी होती.