Join us

टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:47 PM

Ratan tata Story: सातव्या शतकापर्यंत पारशी धर्म हा इराणचा मुख्य धर्म होता. पारशी लोकांवर धर्मांतर करण्याचा दबाव वाढला तेव्हा काही लोकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

भारतात आता फार कमी पारशी समाज उरला आहे. पारशी समाजाची लोकसंख्या आता कमी कमी होऊ लागली आहे. हा समाज इराणहून भारतात आला होता. इराणमध्ये तेव्हा इस्लामीकरणाचे वारे वाहू लागले होते. यामुळे पारशी समाजावर मुस्लिम बनण्यासाठी दबाव टाकला जात होता. सातव्या शतकापर्यंत पारशी धर्म हा इराणचा मुख्य धर्म होता. पारशी लोकांवर धर्मांतर करण्याचा दबाव वाढला तेव्हा काही लोकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

हे पारशी लोक गुजरातला आले. भारताच्या औद्योगिक क्रांतीमध्ये या समाजाचे फार मोठे योगदान आहे. हे जरी आता भारतीय असले तरी ते मुळचे इराणचे आहेत. टाटा, गोदरेज, पुनावाला यांसारखे उद्योजक याच समाजातून उदयास आलेले आहेत. एवढेच नाही तर भारताला अण्वस्त्रधारी बनविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते होमी जहांगीर भाभा हे देखील पारशीच. प्रसिद्ध अर्थशास्त्री आणि देशाला स्वातंत्र्य देण्याची पहिली सार्वजनिकरित्या मागणी करणारे दादाभाई नौरोजी हे देखील याच समाजाचे होते. 

अर्देशिर गोदरेज आणि त्यांचे भाऊ पिरोजशाह बुर्जोरजी यांनी गोदरेज ब्रदर्सची स्थापना केली होती. जमशेद टाटा यांनी टाटा ग्रुपची स्थापना केली होती. फिरोजशाह मेहता हे राजकारणी आणि वकील होते. त्यांनी इंडियन नेशनल कांग्रेसचे सहसंस्थापक आणि अध्यक्षपद भुषविलेले आहे. फिरोज गांधी हे इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार आणि स्वातंत्र सैनिक होते. सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. या कंपनीने कोरोना काळात जगाला लसच दिली नाही तर भारताला औषध निर्मिती क्षेत्रात अग्रेसर बनविलेले आहे. 

दिनशॉ मानेकजी पेटिट यांनी भारतातील पहिल्या कापड कारखान्याची स्थापना केली होती. मुंबईत अनेक शिक्षण संस्थांचा पाया रचणारे उद्योगपती व बी.जे मेडिकल कॉलेजचे संस्थापक बायरामजी जीजीभॉय सीएसआय, बी.पी. वाडिया भारतातील कामगार संघटनांचे प्रणेते हे देखील याच इराणमधून भारतात स्थायिक झालेले होते. 

याचबरोबर अभिनेत्री अरुणा इराणी, ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी, अभिनेता जॉन अब्राहम, दिवंगत उद्योगपती पालोनजी मिस्त्र,  सायरस मिस्त्री, म्युझिक डिरेक्टर जुबिन मेहता अशा अनेकांची नावे यामध्ये घेता येतील. 

टॅग्स :रतन टाटाइराण