नवी दिल्ली : डेलला (Dell) सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये स्थान मिळाले आहे. यानंतर एमआय मोबाईल्स (Mi Mobiles) दुसऱ्या क्रमांकावर आणि सॅमसंग मोबाईल्स (Samsung Mobiles) तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे या यादीत टाटाच्या 36 ब्रँड्सनी स्थान मिळवले आहे. टीआरएचा (TRA) अकरावा ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट (BTR) 2022 जाहीर झाला आहे. यामध्ये डेलने सलग तिसऱ्या वर्षी इंडियाज मोस्ट ट्रस्टेड ब्रँड हा गौरव प्राप्त केला आहे. त्यानंतर, मोबाइल फोन श्रेणीमध्ये आघाडीवर असलेल्या एमआय मोबाइल्सने दुसरा क्रमांक आणि सॅमसंग मोबाइल्सने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या तिन्ही ब्रँडने टीआरआयच्या अगोदरच्या वर्षाच्या अहवालातही हेच क्रमांक मिळवले होते. या वर्षीच्या अहवालामध्ये, टाटा समूहातील 36 ब्रँडनी स्थान मिळवले आहे.
एलजी टेलिव्हिजनने टेलिव्हिजन श्रेणीमध्ये आघाडी घेतली आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा एक स्थान उंचावत चौथा क्रमांक पटकावला आहे. अॅमेझॉनने अकरा स्थाने उंचावून पाचवा क्रमांकावर स्थान मिळवले आहे. लवकरच आयपीओ दाखल करणार असलेल्या एलआयसी या सरकारी आयुर्विमा कंपनीने तीव्र स्पर्धा करत, सहावे स्थान मिळवले आहे. बीएमडब्लू हा प्रीमिअम टू-व्हीलर उत्पादक ब्रँड या वर्षी सातव्या स्थानावर असून त्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारा ब्रँडने मागे टाकले आहे. टायटन या घड्याळ श्रेणीतील आघाडीच्या ब्रँडने 33 ब्रँडना मागे टाकून आठवे स्थान साध्य केले आहे. लेनोव्हो लॅपटॉप्सने 63 ब्रँडना हरवून नववे स्थान पटकावले आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स – डायव्हर्सिफाइड श्रेणीतील सॅमसंगचा क्रमांक दहावा आहे.
सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन, हिंदी-जीईसीने चार स्थाने गमावून अकरावा क्रमांक मिळवला आहे. टू-व्हीलर उत्पादक होंडाने अगोदरच्या वर्षातील बारावा क्रमांक कायम राखला आहे. 2022 मधील भारतातील मोस्ट ट्रस्ट ब्रँडमध्ये टाटा सॉल्ट 13व्या स्थानी असून ब्रँडने आठ ब्रँडना मागे टाकले आहे, तसेच तनिष्कने 34 ब्रँडना हरवून 14वे स्थान साधले आहे. आयसीआयसीआय बँकेने यंदाच्या मोस्ट ट्रस्टेड ब्रँडच्या यादीत 14 स्थाने ओलांडून 15वे स्थान मिळवले आहे.
16 ते 21 क्रमांकावर असलेल्या काही ब्रँडची क्रमवारी अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत घसरली आहे. सॅमसंग टेलिव्हिजनने सात स्थाने गमावून 16वा क्रमांक साधला आहे, दोन स्थाने गमावून अॅपलने 17वा आणि आठ स्थाने गमावून विवोने 18वा क्रमांक साध्य केला आहे. टीआरएच्या मोस्ट ट्रस्टेड ब्रँड्स रिपोर्ट – 2022 मध्ये समाविष्ट केलेल्या 1000 ब्रँडच्या यादीमध्ये, यंदा पाच स्थाने घसरलेला एलजी रेफ्रिजरेटर्स 19व्या स्थानी आहे, तर 12 स्थाने घसरलेल्या मारुती सुझुकीला 20 वे स्थान मिळाले आहे.
यंदाचा अहवाल थोडा वेगळा असून, काही समूह ब्रँडनी अन्य ब्रँडना लक्षणीय प्रमाणात मागे टाकले आहे. पहिल्यांदाच, टाटा समूहातील 36 ब्रँडनी या यादीमध्ये स्थान मिळवले असून, गोदरेजच्या 9 ब्रँडनी यादीमध्ये बाजी मारली आहे. अमूल, एलजी, एमअँडएम, सॅमसंग यांचे प्रत्येकी 8 आणि रिलायन्सचे 7 ब्रँड अहवालामध्ये समाविष्ट झाले आहेत, असे टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी संशोधनातील निष्कर्षांविषयी सांगितले.