Join us

माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 3:41 PM

एका आई-मुलीच्या जोडीने अवघ्या ५००० रुपयांच्या गुंतवणुकीसह एक्स्ट्रोकिड्स (Extrokids) नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. जी कंपनी आता लाखो रुपयांचा नफा कमवत आहे.

एका आई-मुलीच्या जोडीने अवघ्या ५००० रुपयांच्या गुंतवणुकीसह एक्स्ट्रोकिड्स (Extrokids) नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. जी कंपनी आता लाखो रुपयांचा नफा कमवत आहे. या कंपनीला दर महिन्याला १५००० हून अधिक ऑर्डर मिळतात. ही एक खेळणी विकणारी कंपनी आहे. एस हरिप्रिया हिने आपली आई एस बानू यांच्यासोबत हा व्यवसाय सुरू केला.

एस हरिप्रियाने आईसोबत ऑनलाइन खेळण्यांचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या सुरुवातीच्या खर्चासाठी ५००० रुपये गुंतवले होते. आई-मुलीच्या जोडीने मुलांसाठी अशी खेळणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला ज्यामुळे मुलांचा मेंदू विकसित होईल. त्यांनी Extrokids नावाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला. या ठिकाणी ते त्यांची उत्पादनं विकतात आणि आज त्यांना लाखो रुपयांच्या ऑर्डर मिळत आहेत.

नवीन पालकांसमोरील मुख्य आव्हानांपैकी एक म्हणजे आपल्या मुलांना व्यस्त कसं ठेवायचं? विशेषतः जेव्हा मुलं चालायला लागतात. स्क्रीन एक्सपोजर कमी करताना मुलांचं मनोरंजन आणि त्यांना काहीतरी नवीन शिकवण्याचा मार्ग शोधत आहेत. एस हरिप्रिया हिच्या मनात २०१७ मध्ये मुलाचा जन्मानंतर हाच प्रश्न होता. तिने एक खेळणं शोधलं जे शिक्षण आणि मनोरंजन दोन्ही करू शकेल. यानंतर तिने आईसोबत व्यवसाय सुरू केला.

हरिप्रियाने तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील तिच्या घरातून अवघ्या ५००० रुपयांपासून हा उद्योग सुरू केला. तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. विशेषत: खेळण्यांचा शोध घेताना अनेक समस्या निर्माण झाल्या. खूप संशोधन केल्यावर तिला मेंदू विकसित करणाऱ्या खेळण्यांबद्दल माहिती मिळाली. सुरुवातीला तिने आवडलेली पुस्तकं आणि खेळणी विकली, पण नंतर त्यांनी त्यांचं लक्ष खेळण्यांकडे वळवलं.

ऑर्डरची वाट पाहत असताना त्यांनी मुलांना नवीन खेळण्यांचीही ओळख करून दिली. त्याचा मुलांवर होणारा सकारात्मक परिणाम पाहून त्यांना आनंद झाला. आज त्यांच्याकडे ५०० हून अधिक खेळण्यांचं कलेक्शन आहे. तसेच ५ लाखांहून अधिक ग्राहकांची ऑर्डर डिलिव्हर केली आहे.

हरिप्रियाने सांगितलं की, एक वेळ आली जेव्हा तिच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. एके दिवशी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि तो व्हिडीओ असा होता की, त्यात एका विशिष्ट खेळण्याने कसं खेळायचं ते सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये तिची आई देखील होती. हा व्हिडीओ ६० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला, येथून त्याच्या व्यवसायाचं नशीब बदललं. हरिप्रियाच्या म्हणण्यानुसार, त्यांची दर महिन्यांची कमाई सुमारे ३ लाख रुपये आहे. त्यांच्या खेळण्यांची किंमत ४९ रुपयांपासून ते ८००० रुपयांपर्यंत आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय