नवी दिल्ली-
'धारा' ब्रँडच्या नावानं खाद्यतेल (Edible Oil) विकणारी सहकारी कंपनी मदर डेअरीनं (Mother Dairy) मोहरी, सोयाबीन आणि सुर्यफूलाच्या तेलाच्या दरात मोठी घट केली आहे. मदर डेअरीसोबतच इतरही अनेक कंपन्यांनी आपल्या खाद्यतेलाच्या दरात घट केली आहे. त्यामुळे महगाईनं त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मदर डेअरनं जारी केलेल्या निवेदनानुसार धारा ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्यतेलाच्या दरात जवळपास १५ रुपयांपर्यंत घट करण्यात आली आहे. ही घट थेट विक्री किमतीवर असणार आहे. सरकारचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात घट आणि स्थानिक पातळीवर खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता या कारणांमुळे कंपनीनं मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दराच्या छापील किमतीचे प्रोडक्ट लवकरच बाजारात उपलब्ध होतील असंही मदर डेअरीनं स्पष्ट केलं आहे.
पाम तेलही झालं स्वस्त
इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकार राव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्य तेलाच्या दरातील घसरणीचा फायदा आता ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पाम तेलाच्या किमतीतही ७ ते ८ रुपये प्रतिलीटर घसरण झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलीटर १० ते १५ रुपयांची घट झाली आहे. याशिवाय सोयाबीन तेल प्रतिलीटर ५ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
Fortune तेलही होणार स्वस्त
खाद्य तेलाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या Adani Wilmar चे व्यवस्थापकीय संचालक अंगुश मलिक यांच्या माहितीनुसार कंपनी लवकरच Fortune ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्य तेलाच्या दरात घट करणार आहे. बाजारातील ट्रेंड पाहून खाद्य तेलाच्या विक्री दरात घट करण्यात आलेले प्रोडक्ट बाजारात लवकरच उपलब्ध होतील असं मलिक म्हणाले.
दुसरीकडे हैदराबादची कंपनी Gemini Edibles and Fats नं गेल्या आठवड्यात Freedom Sunflower Oil च्या एक लीटर पाऊचच्या किमतीत १५ रुपयांची घट करुन २२० रुपये प्रतिलीटर पाऊच उपलब्ध करुन दिले आहे. या आठवड्यात कंपनी यात आणखी २० रुपये प्रतिलीटर दर कमी करण्याची शक्यता आहे.
सनफ्लावर तेलाचा पुरवठा वाढला
गेल्या काही दिवसांपासून सूर्यफूल म्हणजेच सनफ्लावर तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रशिया आणि अर्जेंटिनासारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात पुरवठा सुरू झाला आहे. याचा थेट परिणाम किमतीवर झाला असून मूबलक उपलब्धतेमुळे किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसंच केंद्र सरकारनं खाद्यतेलावरील आयात शुल्क देखील कमी केलं आहे. त्यामुळेही तेलाच्या दरात घट झाली आहे.