Join us  

"आरडाओरड, अपमान रोजचं झालंय"; अधिकाऱ्यांनी केली होती तक्रार, SEBI प्रमुख माधबी बुच यांच्या अडचणी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 11:35 AM

बाजार नियामक सेबीमध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याची माहिती समोर येत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे एक तक्रार केली होती.

बाजार नियामक सेबीमध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याची माहिती समोर येत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे एक तक्रार केली होती. कॅपिटल अँड कमोडिटी मार्केट रेग्युलेटरच्या नेतृत्वावर टॉक्सिक वर्क कल्चरला प्रोत्साहन दिल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. 

सेबीच्या बैठकांमध्ये ओरडणं, सर्वांसमोर अपमान करणं सामान्य झालं आहे, असं ६ ऑगस्ट रोजी अर्थमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. बुच यांच्यावर अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आरोप असताना हे पत्र समोर आलं आहे. इतकंच नाही तर काँग्रेसनंही बुच यांच्यावर आरोप केले होते.

सुभाष चंद्रांकडूनही आरोप

झी समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांनीही बुच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र बुच यांनी हे आरोप फेटाळत आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं म्हटलंय. 'अधिकाऱ्यांनी पत्रात ज्या तक्रारी केल्या होत्या त्यांचं निराकरण करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे,' असं नियामकानं पत्राद्वारे म्हटलं. रेग्युलेटरमध्ये ग्रेड ए किंवा त्यापेक्षा जास्त श्रेणीतील सुमारे १,००० अधिकारी आहेत. त्यापैकी निम्म्या म्हणजे सुमारे ५०० जणांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबत ईटीच्या प्रश्नांना उत्तर दिलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

चुकीच्या भाषेचा वापर

बुच यांच्या नेतृत्वाखालील टीम कर्मचाऱ्यांसोबत कठोर आणि चुकीच्या भाषेचा वापर करते. त्यांच्या क्षणोक्षणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवते. जी टार्गेट्स साध्य करणं अशक्य आहे, ती दिली जातात,' असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. सेबीच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच सेबीच्या अधिकाऱ्यांनी नेतृत्वावर असे आरोप केले आहेत. नेतृत्वाच्या अशा वागणुकीमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असून वर्क लाईफ बॅलन्सही बिघडला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. व्यवस्थापनानं त्यांच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्यानं त्यांना अर्थ मंत्रालयाला पत्र लिहावे लागलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांनी पाच पानांचं पत्र अर्थ मंत्रालयाला पाठवलं आहे. 'कार्यक्षमता वाढवण्याच्या नावाखाली व्यवस्थापनानं यंत्रणेत आमूलाग्र बदल केले आहेत. नेतृत्व प्रत्येक अधिकाऱ्याचं नाव घेऊन त्यांच्यावर ओरडतात. उच्च पदस्थ लोक चुकीची भाषा वापरतात. परिस्थिती अशी झाली आहे की, वरिष्ठ व्यवस्थापनातील कोणीही हस्तक्षेप करण्यासाठी पुढे येत नाही. उच्च पदावर बसलेल्या लोकांची इतकी भीती असते की, वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. नियामक बाह्य भागधारकांसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी काम करीत आहे, परंतु आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वास वाढत आहे,' असंही त्या पत्रात नमूद करण्यात आलंय.

काय म्हटलं सेबीनं?

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी योग्य ते बदल करण्यात आले आहेत आणि सर्व समस्यांचं निराकरण करण्यात आलंय. कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन संघटनांनी ३ सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे या बदलांचा स्वीकार केलाय, असं स्पष्टीकरण सेबीकडून देण्यात आलं.

टॅग्स :सेबीशेअर बाजारसरकारमाधबी पुरी बुच