जिल्हा परिषद सभापती निवडणूक
नाशिक : अवघ्या ७२ तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात शांतता दिसत असून, या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे सावट आले आहे. सर्वच इच्छुक आपापल्या मतदारसंघात पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतींची निवड येत्या शनिवारी (दि. ४) होत असून, निवडणुकीसाठीचे माहिती वजा सभेचा अजेंडा सर्वच सदस्यांना पोहोच झाला आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने कॉँग्रेसच्या गोटात कमालीचे नैराश्य आले असून, आता कोणतीही समिती घ्यायची नाही, तटस्थ राहायचे इतपत कॉँग्रेसच्या पदाधिकार्यांची मानसिकता झाल्याचे, तर सर्व आयतेच चालत आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे. सभापतिपदासाठी इच्छुकांचे लॉबिंगही सुरू झाले आहे. शिवसेना तटस्थ राहिल्यास आणि कॉँग्रेसची एकूण भूमिका पाहता राष्ट्रवादीलाच पुन्हा चारही विषय समिती सभापतिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे, तर दुसर्या एका मतप्रवाहानुसार राष्ट्रवादीने शिवसेनेला किंवा भाजपा व माकपाला सोबत घेऊन दोन-दोेन समित्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून रवींद्र देवरे, शैलेश सूर्यवंशी, यतिन पगार, गोरख बोडके, बाळासाहेब गुंड, प्रवीण गायकवाड, इंदुमती खोसकर, संगीता ढगे, उषा बच्छाव आदि इच्छुक आहेत, तर शिवसेनेकडून प्रवीण जाधव, बंडू गांगुर्डे, भाजपाकडून केदा अहेर इच्छुक आहेत. शिवसेना आणि कॉँग्रेसची काय भूमिका राहते यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष असून, खर्या घडामोडी शुक्रवारी (दि. ३) दसर्याच्या दिवशीच होणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)
हालचाली मंदच, विधानसभेचा परिणाम
जिल्हा परिषद सभापती निवडणूक
By admin | Published: September 30, 2014 09:39 PM2014-09-30T21:39:23+5:302014-09-30T22:28:19+5:30