Join us

Amazon इंडियाने १००० किलो गांजा विकला? अधिकाऱ्यांवर तस्करीचा आरोप; संचालकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 7:01 PM

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोपाळ: ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अ‍ॅमेझॉन इंडियाबाबत (Amazon India) मध्य प्रदेशपोलिसांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे गोड पदार्थ (स्वीटनर) विकण्याच्या नावाखाली गांजाची विक्री केली जात होती, असा मोठा दावा मध्य प्रदेशातील भिंड जिल्हा पोलिसांनी केला असून, या प्रकरणी अ‍ॅमेझॉन इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी ही बाब उघड केल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीर उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी देत नाही आणि या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत आहे. त्याचबरोबर या प्रकरणातल्या विक्रेत्यांवर आपल्या बाजूनेही कडक कारवाई केली जाईल. भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात एएसएसएल (ASSL) म्हणून काम करणाऱ्या अ‍ॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्याच्या कलम ३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉन इंडियाने एक हजार किलो गांजा 

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या काही कार्यकारी संचालकांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी कंपनीकडे केली असता, त्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि दिलेली उत्तरे यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किती संचालकांवर कारवाई झाली याबाबतची माहिती मात्र पोलिसांनी दिलेली नाही. पोलिसांनी यापूर्वीही या संचालकांशी गांजा तस्करीविषयी चौकशी केली होती. पोलिसांचा अंदाज आहे की, साधारण १ लाख ४८ हजार कोटी डॉलर्स किमतीचा एक हजार किलो गांजा आत्तापर्यंत अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विकला गेला आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे.

पोलिसांकडून २१.७ किलो गांजा जप्त

FIR मध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव नाही. १३ नोव्हेंबर रोजी ग्वाल्हेरचे रहिवासी बिजेंद्र तोमर आणि सूरज उर्फ कल्लू पवैय्या यांच्याकडून २१.७ किलो गांजा जप्त केल्यानंतर जिल्ह्यातील गोहड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे मनोज कुमार सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने या गंभीर प्रकरणी केंद्र सरकारकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आणि अ‍ॅमेझॉनने विक्रेत्याचे काम केल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांपेक्षा गंभीर काम अ‍ॅमेझॉनने केले, त्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सीएआयटीने केली आहे. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनमध्य प्रदेशपोलिस