MS Dhoni: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. बँकेने रविवारी महेंद्रसिंग धोनीची अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केली. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून धोनी एसबीआयची मार्केटिंग आणि जाहिराती करेल.
अधिकृत वक्तव्यानुसार, तणापूर्ण परिस्थितीत धोनी अतिशय संयमाने खेळतो आणि अचूक निर्णय घेतो. त्याच्या याच क्षमतेमुळे बँकेच्या ग्राहकांचाही विश्वास वाढेल आणि बँकेचा ग्राहकवर्ग वाढण्यात मदत होईल. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, एसबीआयच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी एमएस धोनीची नियुक्ती करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. धोनी एसबीआयसोबत जोडला गेल्याने आमच्या ब्रँडला आणखी लोकांपर्यंत पोहचेल.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. ही देशातील सर्वात मोठी कर्जदातादेखील आहे. बँकेने आतापर्यंत 30 लाखाहून अधिक भारतीय कुटुंबांची घर खरेदीची स्वप्ने पूर्ण केली आहेत. बँकेचा होमलोन पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जून 2023 पर्यंत बँकेच्या ठेवी 45.31 लाख कोटींपर्यंत आहेत. गृहकर्ज आणि वाहन कर्जामध्ये एसबीआयचा बाजारातील हिस्सा अनुक्रमे 33.4 टक्के आणि 19.5 टक्के आहे. SBI च्या देशभरात 22,405 शाखा आणि 65,627 ATMs किंवा ADWM चे सर्वात मोठे नेटवर्क असून 78,370 BC आउटलेट आहेत.