Join us

MSSC Scheme: स्मृती इराणींनी रागेत उभं राहून सुरू केलं खातं, बजेटमध्ये झालेली घोषणा; सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 12:31 PM

या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

Mahila Samman Saving Cirtificate : महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी, सरकारनं १ एप्रिल २०२३ पासून महिला सन्मान बचत पत्र २०२३ या नावाने पोस्ट ऑफिसद्वारे संचालित नवीन बचत योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. या योजनेत निर्धारित वेळेपर्यंतच गुंतवणूक केली जाऊ शकते. देशाच्या महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्लीतील संसद मार्गावरील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचून त्यांचे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडले.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी २६ एप्रिल रोजी सामान्य नागरिकाप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचून या सरकारी योजनेचं (MSSC स्कीम) खातं उघडलं. रांगेत उभं राहून त्या काउंटरवर पोहोचल्या आणि सर्व औपचारिकता पूर्ण केली. खातं उघडल्यानंतर त्यांना ऑपरेटरनं पावतीही दिली. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा उपक्रम आहे. या शासकीय योजनेचा महिला व मुलींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन यावेळी स्मृती इराणी यांनी केलं. स्मृती इराणी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून खातं उघडतानाचा फोटो ट्वीट केला आहे.

किती मिळतं व्याज?महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहज खातं उघडता येतं. या योजनेत दोन वर्षांत जास्तीत जास्त दोन लाख रुपये ठेवीसह आंशिक पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये ७.५ टक्के दरानं तिमाही चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे. या स्कीममधील गुंतवणुकीचा मॅच्युरिटी कालावधी २ वर्षांचा आहे, तर तुम्ही फक्त १००० रुपयांच्या किमान गुंतवणुकीसह खाते उघडू शकता. मॅच्युरिटी कालावधीपूर्वी पैसे काढण्याची सुविधाही या योजनेत देण्यात आली आहे.

२०२५ पर्यंत सुरू राहणार स्कीमही सरकारी स्कीम वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. म्हणजेच ती मुदत ठेव योजना (एफडी योजना) सारखी आहे. कोणत्याही वयाची मुलगी किंवा महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीची मर्यादा केवळ २ लाख रुपये आहे. त्यामुळे या योजनेत तुम्ही २ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे या तारखेपर्यंत तुम्ही खातं उघडून त्यात गुंतवणूक केल्यास या योजनेचे फायदे मिळू शकतात.

टॅग्स :स्मृती इराणीनिर्मला सीतारामन