Join us  

MTNL Share Price : सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, बजेटमध्ये उघडली तिजोरी; ४ दिवसांत जबरदस्त रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:59 AM

शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आणि ९७ रुपयांच्या पुढे गेला. अर्थसंकल्पात घोषणा झाल्यापासून या शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएलच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आणि ९७ रुपयांच्या पुढे गेला. अर्थसंकल्पात घोषणा झाल्यापासून या शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यामुळे महिन्याभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झालेत. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पात सरकारी टेलिकॉम कंपन्यांसाठी तिजोरी उघडली. यात बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्यांचा समावेश आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या एमटीएनएलच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे.

किती आली तेजी?

अर्थसंकल्पाच्या दिवशी २३ जुलै रोजी एमटीएनएलचा शेअर सुमारे ८३ रुपयांवर खुला झाला. अर्थसंकल्प संपताच हा शेअर ७४ रुपयांपर्यंत खाली आला. मात्र, त्यानंतर लगेचच त्यात तेजी दिसून आली आणि दिवसभराचा व्यवहार संपेपर्यंत तो सुमारे ८४ रुपयांवर गेला. त्यानंतर त्यात सातत्यानं वाढ होत गेली. शुक्रवारी तो ५ टक्क्यांनी वधारून ९७.०८ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे गेल्या ४ दिवसांत जवळपास २४ टक्के परतावा दिला आहे.

एका महिन्यात रक्कम दुप्पट

एमटीएनएलच्या शेअर्सनी एका महिन्यात गुंतवणूकदारांची रक्कम दुपटीपेक्षा अधिक केली आहे. महिनाभरापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत ४४.१९ रुपये होती. आता त्याची किंमत ९७.०८ रुपये झाली आहे. अशा तऱ्हेने त्यात सुमारे १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी त्याच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुमची गुंतवणूक एकूण २.२० लाख रुपये झाली असती, म्हणजेच तुम्हाला एकूण १.२० लाख रुपयांचा नफा झाला असता.

या कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला आहे. वर्षभरात शेअरनं सुमारे ४०० टक्के परतावा दिलाय. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीत १ लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर आज ही रक्कम ५ लाख रुपये झाली असती. म्हणजेच तुम्हाला वर्षभरात ४ लाख रुपयांचा फायदा झाला असता. दुसरीकडे ५ वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर या शेअरनं जबरदस्त रिटर्न दिलेत. ५ वर्षात कंपनीनं जवळपास १४२८% परतावा दिलाय. जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला १४ लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला असता.

१.२८ लाख कोटींची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दूरसंचार मंत्रालयांतर्गत दूरसंचार प्रकल्प आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी १.२८ लाख कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. यातील सर्वाधिक रक्कम सरकारी कंपनी बीएसएनएलसाठी ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या कंपन्यांच्या दूरसंचार सेवेत आणखी सुधारणा होणार आहे. अर्थसंकल्पात बीएसएनएलचे तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी आणि बीएसएनएलच्या रिस्ट्रक्टरिंगसाठी ८२,९१६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. सरकारच्या या घोषणेनंतर एमटीएनएलच्या शेअर्समध्ये तेजी येऊ लागली आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकएमटीएनएलबीएसएनएलकेंद्रीय अर्थसंकल्प 2019