Join us

MTNL Shares: एमटीएनएलच्या शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, २०% च्या उसळीसह विक्रमी स्तरावर; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:35 PM

केंद्र सरकारच्या मालकीच्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) या टेलिकॉम कंपनीच्या शेअरमध्ये आज, १८ जुलै रोजी जोरदार वाढ झाली. या व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वधारला.

MTNL Share Price: केंद्र सरकारच्या मालकीच्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) या टेलिकॉम कंपनीच्या शेअरमध्ये आज, १८ जुलै रोजी जोरदार वाढ झाली. या व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वधारून ६४.०८ रुपयांवर पोहोचला, हा गेल्या अनेक वर्षांतील उच्चांकी स्तर आहे. कंपनीच्या रोख्यांवरील थकीत व्याज तातडीने फेडण्यासाठी सरकारनं ९२ कोटी रुपये जमा केल्याच्या वृत्तानंतर ही तेजी आली. तसेच, येत्या काळात व्याजापोटी ६४ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कमही देण्यात येणार आहे.

सरकारच्या या मदतीमुळे एमटीएनएलवरील संकटाची परिस्थिती टळली आहे. टेलिकॉम कंपनी आपल्या कर्जाच्या दायित्वाच्या, विशेषत: सरकारी गॅरंटीड बाँड्सच्या बाबतीत पेमेंट संकटाच्या उंबरठ्यावर होती. निधीअभावी काही रोखेधारकांना व्याज देण्यास असमर्थता दर्शविल्याचा खुलासा एमटीएनएलने ११ जुलै रोजी केला होता. निधीअभावी VIII-A रोख्यांवर सहामाही व्याज भरण्यासाठी एस्क्रो खात्यात पैसे जमा करता आले नसल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.

काही रोख्यांवरील दुसरे सहामाही व्याज (७.५९ टक्के) २० जुलै रोजी देय आहे. ऑगस्टमध्ये थकीत व्याजाची थकबाकी भरण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस ६४ कोटी रुपयेही देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमटीएनएलला जुलै ते डिसेंबर या कालावधीत १४ रोख्यांवर व्याज द्यावं लागणार आहे.

ग्राहकांच्या संख्येत घट

दिल्ली आणि मुंबईत दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या एमटीएनएल या सरकारी कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत सातत्यानं घट झाली आहे. एमटीएनएलचा तोटा आर्थिक वर्ष २०२३ मधील २,९१५.१ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाढून ३,२६७.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एनएसईवर दुपारी १.४० वाजता एमटीएनएलचा शेअर २० टक्क्यांनी वधारून ६४.०८ रुपयांवर व्यवहार करत होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ९३.०१ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना २३१.१६ टक्के परतावा दिला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एमटीएनएलशेअर बाजार