Join us

अदानींच्या पुढे गेले मुकेश अंबानी, नेटवर्थ १०० बिलियन डॉलर्स पार; या शेअरवर एक्सपर्ट बुलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 9:50 AM

भारतातील दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

Mukesh Ambani Net Worth: भारतातील दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर लिस्टनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती १०५.१० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ते आता ११ व्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे या यादीत गौतम अदानी १६ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७९.४ अब्ज डॉलर्स आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, कंपनीचे शेअर्स सध्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.

२ दिवसांत ५ टक्क्यांची वाढ

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ९३,१२१.६४ कोटी रुपयांनी वाढलंय. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मौल्यवान कंपनीचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर २.५८ टक्क्यांनी वाढून २,७१८.४० रुपयांवर बंद झाले. तर कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता.

'हे' शेअर्सदेखील करतायत कमाल

कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये ५.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ९३,१२१.६४ कोटी रुपये जोडले गेले आणि ते १८,३९,१८३.६४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजच नाही तर नेटवर्क १८ च्या शेअर्समध्येही गेल्या आठवड्याभरात ४५ टक्क्यांची तेजी दिसून आली. तर टीव्ही १८ ब्रॉडकास्टच्या शेअरमध्येही गेल्या पाच सेशन्समध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

ब्रोकरेज फर्म Goldman Sachs नं रिलायन्स इंडस्ट्रीजला बाय रेटिंग दिलं आहे. रिलायन्सचं नवं टार्गेट प्राईज २८८५ रुपये सेट करण्यात आलंय. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटिजही यावर बुलिश आहेत. त्यांनी ३०५० रुपयांचं टार्गेट प्राईज सेट केलंय.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. ब्रोकरेजची मतं ही वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :मुकेश अंबानीगौतम अदानीरिलायन्सशेअर बाजार