Join us

मुकेश अंबानी यांनी दुबईत घेतले सर्वात महागडे घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:13 PM

Mukesh Ambani : पाम जुमेराह हे दुबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेले खजुराच्या झाडाच्या आकारातील बेट असून तेथे जगातील अतिश्रीमंत लोकांनी आलिशान बंगले खरेदी केले आहेत.

दुबई : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गेल्या आठवड्यात दुबईतील पाम जुमेराहमध्ये आणखी एक आलिशान बंगला १६३ दशलक्ष डॉलरला (सुमारे १,३५६ कोटी रुपये) खरेदी केला आहे. दुबईमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सगळ्यांत महागडा सौदा ठरला आहे.

पाम जुमेराह हे दुबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेले खजुराच्या झाडाच्या आकारातील बेट असून तेथे जगातील अतिश्रीमंत लोकांनी आलिशान बंगले खरेदी केले आहेत. मुकेश अंबानी यांनी कुवैतचे प्रसिद्ध व्यावसायिक मोहंमद अलशाया यांच्या परिवाराकडून ही मालमत्ता खरेदी केली असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. दुबईच्या भूमी व्यवहार विभागाने मात्र खरेदीदाराची ओळख जाहीर न करता या व्यवहाराची माहिती दिली आहे. 

रिलायन्स आणि अलशाया यांच्याकडून कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही. कुवैतचा दिग्गज व्यावसायिक समूह असलेल्या अलशायाकडे स्टारबक्स, एचअँडएम आणि व्हिक्टोरिया सिक्रेट यांसारख्या रिटेल ब्रँड्सच्या स्थानिक फ्रेंचाईजी आहेत. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या स्थानावर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आहेत. अदानी आणि अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या यादीतही अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. 

न्यूयॉर्कमध्ये मालमत्ता घेण्याची तयारीमुकेश अंबानी यांनी गेल्यावर्षी ब्रिटनच्या कंट्री क्लब स्टोक पार्कमध्ये ७९ दशलक्ष डॉलरची मालमत्ता खरेदी केली होती. ते आता न्यूयॉर्कमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या वतीने मालमत्तांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.

दुबईतील दुसरे घर

१. मुकेश अंबानी यांनी दुबईत खरेदी केलेले हे दुसरे घर आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अंबानी यांनी दुबईत ८० दशलक्ष डॉलरचे एक घर खरेदी केले होते. त्यांचे नवे घर या जुन्या घरापासून जवळच आहे, असे सूत्रांनी सांगितले.२. दहा बेडरूम, प्रायव्हेट स्पा, इनडोर व आउटडोर पूल्स इत्यादी आलिशान सुखसोई आहेत. यापूर्वी अंबानी यांनी ८० दशलक्ष डॉलर्समध्ये आलिशान बंगला खरेदी केला होता. 

टॅग्स :मुकेश अंबानीदुबई