Reliance Jio: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सजिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले आणि एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसह अन्य कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले. रिलायन्सजिओने अल्पावधीतच लाखो युझर्स मिळवले. याचा मोठा परिणाम टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीकारक बदलांना सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. याचा फटका अन्य कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसला. यानंतर व्होडाफोन आणि आयडिया यांनी एकत्र येत जिओला टक्कर देण्यासाठी Vi कंपनीची स्थापना केली. मात्र, Jio ची आयडिया नेमकी कुणी दिली, याबाबत खुद्द मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीच एका कार्यक्रमात माहिती दिली.
रिलायन्स जिओला टेलिकॉम क्षेत्रात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कंपनीची जादू अजूनही बाजारावर कायम आहे. सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचे टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. जियो बाजारात येण्यापूर्वी केवळ कॉलिंग सुविधेवर कंपन्या जोर देत होत्या. जिओमुळे कंपन्या डेटावर भर देऊ लागल्या.
Jioच्या आयडियाची कल्पना कोणाची?
एवढी क्रांती करणाऱ्या जिओची आयडिया कोणाच्या सुपीक डोक्यातून आली असेल, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल? कोणत्याही वस्तू, उत्पादन वा सेवेची सुरुवात एका छोट्या कल्पनेतूनच होते. सन २०१८ मध्ये मुकेश अंबानी लंडन येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी जिओची जन्मकथा तिथे सांगितली होती. त्यानुसार, Jio ची कल्पना त्यांना मुलगी ईशाने दिली होती.
अशी आहे जिओची जन्मकथा
सन २०११ मध्ये ईशा येल विद्यापीठात शिक्षण घेत होती. सुट्यांच्या काळात ती घरी आली होती. तिला अभ्यासक्रमाविषयीचे काही अभ्यास करायचा होता. त्यावेळी त्यांनी येथील इंटरनेट अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने कॉलिंग सेवेचे दिवस संपले असून आता इंटरनेटचा जमाना असल्याचे म्हटले होते. याच २०११ मध्ये इंटरनेट अत्यंत कमी गतीने सेवा देत होते. तसेच महागडे असल्याने इंटरनेट हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. येथूनच जिओच्या जन्माची कुळकथा सुरु झाली.
एका भन्नाट कल्पनेने टेलिकॉम इंडस्ट्रीत झाली क्रांती!
सन २०१६ मध्ये बाजारात दाखल झालेल्या जिओने बाजारात धमाल केली. अवघ्या सहा वर्षांत टेलिकॉम बाजार बदलून टाकला. कंपनीने त्यांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि एसएमएस सेवा दिली आणि डेटावर लक्ष्य केंद्रित केले. इतकेच नव्हे, तर आता जिओ लवकरच 5G सेवाही सुरू करत आहे.