जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या यादीमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये संपत्तीत अचानक वाढ झाल्याने झुकरबर्ग मोठी झेप घेऊन श्रीमंतांच्या यादीत १२व्या क्रमांकावर पोहोचले होते. दरम्यान, दुसरीकडे अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांची घसरगुंडी सुरू असून, ते श्रीमंतांच्या यादीत दोन स्थानांनी खाली घसरले आहेत.
Bloomberg Billionaires Index ने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीनुसार रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १.४ अब्ज डॉलर सुमारे ११ हजार ४८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीबरोबरच अंबानी यांची एकूण नेटवर्थ ही वाढून ८५.८ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. एवढ्या संपत्तीसह मुकेश अंबानी आता श्रीमंतांच्या यादीमध्ये एक स्थान वर चढून १२ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. नेटवर्थमध्ये झालेल्या या वाढीमुळे अंबानी झुकरबर्ग यांच्या पुढे पोहोचले आहेत. मात्र दोन्ही अब्जाधीशांच्या संपत्तीमधील अंतर फार कमी आहे.
एकीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये मुकेश अंबानी यांना फायदा झाला असला तरी गौतम अदानी यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. अदानींच्या नेटवर्थमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४.७८ अब्ज डॉलर एवढी घट झाली आहे. त्यामुळे श्रीमंतांच्या यादीत दोन स्थानांनी घसरून २३ व्या स्थानावर पोहोचले आहेत. अदानींची नेटवर्थ ही ५७.१ अब्ज डॉलर एवढी आहे. यावर्षाच्या सुरुवातीला शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या रिसर्च फर्ममुळे अदानींच्या उद्योगसाम्राज्याला मोठा धक्का बसला होता.