मुंबई-
रिलायन्स ग्रूपचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी येत्या दशकात गुजरात राज्यात तब्बल ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आज एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे. यात कंपनी आगामी काळात गुजरातमध्ये एक लाख मेगावॅटची रिन्यूएबल एनर्जीपावर प्लांट आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय कंपनी सौर फोटोवोल्टिक मॉड्युल, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलाइजर, ऊर्जा भंडारण बॅटरी आणि फ्यूअल सेलच्या उत्पादनासाठी कारखान्यांची उभारणी करणार आहे. यासाठी जवळपास ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसंच पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये जवळपास २५ हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत.
रिलायन्सनं जिओच्या दूरसंचार नेटवर्कला 5G मध्ये विकसीत करण्यासाठी तीन ते पाच वर्षात ७,५०० कोटी रुपये आणि रिलायन्स रिटेलमध्ये पुढील पाच वर्षात ३ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.
'व्हायब्रंट गुजरात' परिषदेत करारगुजरातमध्ये आजोजित केल्या जाणाऱ्या 'व्हायब्रंट गुजरात २०२२' संमेलनात प्रचार-प्रसार कार्यक्रमाअंतर्गत गुरुवारी आरआयएल (RIL) कंपनीनं गुजरात सरकारसोबत एकूण ५.९५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या योजनांअंतर्गत राज्यात जवळपास १० लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रिलायन्सनं गुजरात सरकारसोबत केलेल्या करारानुसार कच्छ, बनासकांठा आणि धोलेरामध्ये १ लाख मेगावॅट क्षमतेची नवऊर्जा योजनांसाठी जमीन संशोधनाची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीनं कच्छमध्ये ४.५ लाख एकर जमीनचीही मागणी केली आहे.