नवी दिल्ली: जागतिक घडामोडींचा चांगलाच फटका शेअर मार्केटवर पडताना दिसत आहे. शेअर बाजारातील दोन दिग्गज कंपन्यांना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. सर्वाधिक मार्केट कॅप असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजला (Reliance) यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले असून, यामुळे कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘१०० अब्ज डॉलर्स क्लब’ मधील स्थान मुकेश अंबानी यांना गमवावे लागले आहे.
अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनाही शेअर मार्केटमधील पडझडीचा जोरदार फटका बसला आहे. शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर घसरला. त्यामुळे अंबानी यांच्या एकूण संपत्तीत १.८२ अब्ज डॉलर्सची घसरण झाली. आता अंबानी यांची एकूण संपत्ती ९९.३ अब्ज डॉलर झाली आहे. या घसरणीनंतर जागतिक पातळीवरील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अंबानी आठव्या स्थानी घसरले आहेत. नुकताच अंबानी यांनी गौतम अदानी यांना मागे टाकत आशियातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते.
गौतम अदानी नवव्या स्थानी
अदानी यांच्या एकूण संपत्तीत देखील घसरण झाली आहे. अदानी समूहातील शेअरमध्ये झालेल्या घसरणीनं अदानी यांची एकूण संपत्ती ९८.३ अब्ज डॉलर्स झाली आहे. अदानी यांच्या एकूण सात कंपन्यांपैकी सहा शेअरमध्ये घसरण झाली. जगभरातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत गौतम अदानी नवव्या स्थानी आहेत. गेल्या महिन्यात अदानी यांनी १२५ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी संपत्तीसह जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीच पाचव्या क्रमांकावर झेप घेतली होती.
दरम्यान, ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, अव्वल स्थानी इलॉन मस्क असून, त्यांची संपत्ती २१६ अब्ज डॉलर आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांची संपत्ती १४५ अब्ज डॉलर्स संपत्तीनुसार दुसऱ्या स्थानी आहे. फ्रान्सचे उद्योजक बर्नाड अर्नोल्ट हे तिसऱ्या स्थानी असून त्यांची संपत्ती १३५ डॉलर आहे. चौथ्या स्थानी बिल गेट्स असून त्यांची संपत्ती १२३ अब्ज डॉलर्स आहे. जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे ११२ अब्ज डॉलर्स संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत.