देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे एखादी डील झाली आहे. अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) अदानी पॉवरची (Adani Power) सहकारी कंपनी महान एनर्जन (Mahan Energen) चे तब्बल पाच कोटी शेअर खरेदी केले आहेत. रिलायन्सने एका एक्सचेन्ज फायलिंगमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. ही डील 50 कोटी रुपयांची आहे. रिलायन्सने मार्च महिन्यातच या डीलची घोषणा करत, महान एनर्जनमध्ये 26 टक्के वाटा अथवा हिस्सेदारीच्या खरेदीसंदर्भात माहिती दिली होती. आता ही डील पूर्ण झाल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.
महान एनर्जनची स्थापना 2005 मध्ये झाली असून मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात थर्मल प्लांट आहे. आता याची कॅपेसिटी 1200 मेगावॅट एवढी आहे. यापूर्वी या कंपनीची मालकी एस्सार पॉवरकडे होते. अदानी पॉवरने मार्च 2022 मध्ये हिची खरेदी केली होती. आर्थिक वर्ष 2023 मध्ये महान एनर्जनची कमाई 2,730.68 कोटी रुपये एवढी होती.
यापूर्वी 2022 मध्ये कंपनीने 1393.59 कोटी रुपये आणि 2021 मध्ये 692 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू मिळवला होता. आता महान एनर्जनची पॉवर जेनरेशन क्षमता 4,400 मेगावॅटपर्यंत वाढविण्यासाठी अदानी समूह यात जवळपास 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने या प्लांटमधून 500 मेगावॅट विजेच्या कॅप्टिव्ह यूजसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे.
अंबानी-अदानींची नेटवर्थ -
ब्लूमबर्गच्या इंडेक्सनुसार, अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 120 अब्ज डॉलर एवढी आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, अदानीची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलर एवढी आहे. भारत आणि आशियामध्ये ते अंबानींनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 14 व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे औद्योगिक घराणे आहे तर अदानी समूह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही समूह ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत.