Join us

८२ वर्ष जुनी 'रावळगाव' कंपनी अंबानींच्या झोळीत; काय होणार फायदा, किती कोटींमध्ये झाली डील?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 2:48 PM

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेलनं मोठी डील केली आहे.

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेलनं मोठी डील केली आहे. रिलायन्स रिटेलच्या कंपनीनं ८२ वर्ष जुन्या रावळगाव शुगर फार्मच्या कॉफी ब्रेक आणि पान पसंद यांसारख्या ब्रँडचं अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. रावळगाव शुगर फार्म्सकडे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टुटी फ्रूटी, पान पासंद, चोको क्रीम आणि सुप्रीम यांसारखे ब्रँड आहेत. आता या कंपनीनं या उत्पादनांचं ट्रेडमार्क, उत्पादनांची रेसिपी आणि सर्व इंटेलॅक्चुअल प्रॉपर्टी राईट्स रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला (RCPL) या डील अंतर्गत विकण्यात आले आहेत. आरसीपीएल ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची (RRVL) उपकंपनी आहे, जी रिलायन्स ग्रुपचं रिटेल युनिट आहे. 

काय म्हटलंय कंपनीनं? 

रावळगाव शुगर फार्म्सनं स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिलीये. संचालक मंडळानं या ब्रँडचं ट्रेडमार्क आणि सर्व इंटेलॅक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आरसीपीएल २७ कोटी रुपयांच्या व्यवहारात विक्री आणि हस्तांतरित करण्यास मान्यता दिल्याचं कंपनीनं म्हटलंय. मात्र, प्रस्तावित करारानंतरही मालमत्ता, जमीन, प्लांट, इमारत, उपकरणं, यंत्रसामग्री या सर्व मालमत्ता आपल्याकडेच राहणार असल्याचं रावळगाव शुगरने नमूद केलं. अलिकडच्या वर्षांत कन्फेक्शनरी व्यवसाय टिकवणं कठीण झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांमधून वाढलेल्या स्पर्धेमुळे त्यांचा बाजारातील हिस्सा कमी झाला आहे. 

शेअरची स्थिती काय? 

रावळगाव शुगर या बाजारात लिस्टेड कंपनीचे शेअर्स ७८५ रुपयांच्या पातळीवर आहेत. दरम्यान, बीएसईच्या वेबसाइटवर ट्रेडिंग प्रतिबंधाचा मेसेज दिसत आहे. यासाठी जीएसएम हे कारण सांगण्यात आलं आहे. ग्रेडेड सर्व्हिलन्स मेजर्स (GSM) ही प्रामाणिक गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सेबीनं अवलंबलेली एक देखरेखीटी पद्धत आहे. नोव्हेंबर महिन्यात या शेअरची किंमत १,१५७.२५ रुपयांवर गेली होती. हा या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. त्याच वेळी, मार्च २०२३ मध्ये, शेअर ५२ आठवड्यांच्या ५९६.२० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स