युक्रेनला युद्धात लोटल्याने जगाने रशियावर निर्बंध लादले आहेत. यामुळे जगातील मोठा कच्चा तेल पुरवठादार रशियावर कमी दराने तेल विकण्याची वेळ आली आहे. अशातच सरकारी कंपन्यांसोबत आता मुकेश अंबानींच्यारिलायन्सनेदेखील संधी साधली आहे.
रिलायन्सने फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाकडून जवळपास दीड कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिलायन्सने जूनच्या तिमाहीसाठी दर महिन्याला सरासरी पन्नास लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. युक्रेन युद्धाआधी रिलायन्स किंवा अन्य भारतीय कंपन्या फार कमी प्रमाणावर किंवा नाहीच अशा संख्येने रशियाकडून कच्चे तेल घेत होते.
यापैकी सुमारे 8 दशलक्ष बॅरल तेल हे 5 एप्रिल ते 9 मे या काळात रिलायन्सच्या ताब्यात असलेल्या सिक्का बंदरावर येत आहे. यापैकी बहुतेक बॅरल रशियन व्यापारी लिटास्कोने पुरवले आहेत. रिलायन्स डिलिव्हरीच्या आधारावर रशियन तेल खरेदी करत आहे. तेलाचा पहिला साठा हा ESPOकडून मे महिन्याच्या सुरुवातीला पोहोचणार आहे. अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज पश्चिम भारतातील जामनगर भागामध्ये दोन रिफायनरी चालवते जे दररोज सुमारे 1.4 दशलक्ष बॅरल तेलावर प्रक्रिया करू शकते.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. देशात तेलाचे भाव चढे असल्याने भारतीय रिफायनर्सनी स्वस्तात बॅरल्सची खरेदी केली आहे. भारत रोजच्या 5 दशलक्ष बॅरल तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के तेल आयात करतो.