Mukesh Ambani Deal: अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या झोळीत शिपिंग व्यवसायाशी निगडीत एक कंपनी आली आहे. रिलायन्सनं शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. रिलायन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी नौयान ट्रेड्स प्रायव्हेट लिमिटेडनं (NTPL) वेलस्पन कॉर्प लिमिटेडकडून नौयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडचं (एनएसपीएल) अधिग्रहण पूर्ण केलंय. त्याअंतर्गत सुमारे ३८३ कोटी रुपयांना ७४ टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
काय म्हटलंय रिलायन्सनं?
या व्यवहारामुळे नौयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी बनली आहे, असं रिलायन्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. अधिग्रहणापूर्वी रिलायन्सची उपकंपनी नौयान ट्रेड्स प्रायव्हेट लिमिटेडनं नौयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडला ९३.६६ कोटी रुपयांचं विनातारण कर्ज दिलं होतं. एनएसपीएल जुलै २०२१ मध्ये अस्तित्वात आली. गुजरातमधील रिलायन्सच्या दहेज मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सजवळील १३८ एकर जमिनीचे भाडेपट्टे हक्क कंपनीकडे आहेत. सॉल्ट मॅनेजमेंट, अभियांत्रिकी बांधकाम आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर उत्पादनासह औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी जमीन विकसित करण्याची रिलायन्सची योजना आहे.
तिमाही निकाल काय?
रिलायन्स इंडस्ट्रीजनं डिसेंबर तिमाहीत १८,५४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत १७,२५६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही ७ टक्क्यांनी वाढ आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २.४० लाख कोटी रुपये होता. एबिटापूर्वी कंपनीचं उत्पन्न ७.७ टक्क्यांनी वाढून ४३,७८९ कोटी रुपये झालंय, जे मागील वर्षी याच तिमाहीत ४०,६५६ कोटी रुपये होतं.