नवी दिल्ली:रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रिज सर्वाधिक मार्केट कॅपसह शेअर बाजारात आघाडीवर आहे. शेअर बाजारातील पडझडीचा मोठा फटका मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना बसला आहे. मात्र, दुसरीकडे ब्रिटनमधील एका कंपनीसाठी रिलायन्सने कंबर कसली आहे. या कंपनीच्या अधिग्रहणासाठी रिलायन्स उत्सुक असून, यानंतर ही भारताबाहेरील सर्वांत मोठी डील ठरणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांनी ब्रिटनमधील एका बड्या फार्मा कंपनीच्या खरेदीसाठी बोली लावली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने युनायटेड किंगडममधील वॉलग्रीन बूट्स अलायन्स या कंपनीचा यूकेमधील व्यावसायाचे अधिग्रहण करण्यासाठी ऑफर दिली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, बूट्सचे बाजार मूल्य ४८ हजार कोटी (५ अब्ज युरो) आहे. बूट्सचे यू.के मध्ये २२०० हून अधिक स्टोअर्स आहेत. रिलायन्सने अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट या कंपनीसोबत ही बोली लावली आहे. दोन्ही कंपन्यांनी मिळून बूट्ससाठी ५०० कोटी पाऊंड (४८.८ हजार कोटी) ची बोली लावली आहे. जर अंबानींची बोली मंजूर झाली. तर रिलायन्ससाठी भारताबाहेरील सर्वात मोठी डील ठरणार आहे.
ब्रिटनचे अब्जाधीस इसा ब्रदर्स आणि टीडीआर कॅपिटलचीही बोली
बूट्सच्या खरेदीसाठी रिलायन्स आणि अपोलो यांच्यासह इतर दोन कंपन्यांनी बोली लावली आहे. ज्यात ब्रिटनचे अब्जाधीस इसा ब्रदर्स आणि टीडीआर कॅपिटल या कंपन्यांना बूट्स खरेदीच्या रेसमध्ये आहेत. दरम्यान बूट्ससाठी वॉलग्रीन समूहाने ७०० कोटी पाऊंड (६८.३ हजार कोटी) चे मूल्यांकन अपेक्षित केले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना '१०० अब्ज डॉलर्स क्लब' मधील स्थान गमवावं लागलं आहे. शेअर बाजारात बुधवारी रिलायन्सचा शेअर घसरला. त्यामुळे अंबानी यांच्या एकूण संपत्तीत १.८२ अब्ज डॉलर्सची घसरण झाली. आता अंबानी यांची एकूण संपत्ती ९९.३ अब्ज डॉलर झाली आहे. या घसरणीनंतर जागतिक पातळीवरील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अंबानी आठव्या स्थानी घसरले आहेत.